
मुंबई : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. "मी मोदींना शिव्या देवू शकतो, मारू शकतो" असे विधान पटोले यांनी केले होते. त्यानंतर राज्यभरातील भाजपच्या (Bjp) नेत्यांनी पटोले यांच्याविरोधात रान पेटवले आहे. (Nana Patole) विधान अंगलट येत असल्याचे लक्षात येताच पटोले यांनी आपण पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर गावगुंड मोदी याच्या विषयी बोललो होतो, अशी सारवासरव केली. (Congress)
यावर आता भाजपने अधिक आक्रमक होत पटोले मोदी नावाचा गावगुंड कोणता? त्याला समोर आणा,असे आव्हान दिले आहे. भाजपचे प्रवक्ते केशव पाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरलेली गलिच्छ भाषा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांना मान्य आहे का? असा सवाल देखील केला.
पाध्ये म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल सोशल मिडियावर पोस्ट टाकली म्हणून एका तरुणाला तुरूगांत जावे लागले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांनाही एका विधानासाठी अटक करण्यात आली, मग देशाच्या पंतप्रधानांबद्दल एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गलिच्छ आणि हिंसाचाराची भाषा वापरतात, तरी त्यांच्या विरोधात एकही तक्रार पोलिस दाखल करून घ्यायला तयार नाहीत.
काॅंग्रेसचे नेते यावर बोलायला तयार नाहीत. पंतप्रधानांबद्दल पराकोटीचा द्वेष का आहे? राहुल गांधी यांनी पटोले यांची भाषा मान्य आहे का? पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत घडलेला प्रकार असो की मग आता नाना पटोले यांनी केलेले विधान यातून गेल्या सात आठवर्षापासून सातत्याने पराभूत होत असलेल्या काॅंग्रेसची मानसिकता दिसून येते.
नागपूरात पटोले यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी भाजपचे नेते पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहेत, पण तक्रार दाखल करून घेतली जात नाही. गृहमंत्री वळसे पाटील यांचा पोलिसांवर दबाव आहे का? असा सवाल देखील भाजपने उपस्थित केला आहे. चोर तो चोर उलटा शिरजोर ही म्हण पटोले यांना तंतोतंत लागू पडते, कारण पंतप्रधानांचा अपमान करणारे विधान केल्यावर मी त्यांच्याबद्दल नाही तर लोकांना त्रास देणाऱ्या गावगुंडाबद्दल बोललो, असे खोटे समर्थन पटोले करत आहेत.
असे असेल तर मग मोदी नावाचा तो गावगुंड कोण आहे? त्याचा फोटो, त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे, त्याचे संपुर्ण क्रिमनिल रेकाॅर्ड पटोले यांनी समोर आणावे, असे आव्हान देखील पाध्ये यांनी यावेळी दिले. मोदींचा अवमान केल्याप्रकरणी पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, असेही पाध्ये म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.