
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर पुण्याचे मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून होत्या. पण मुंबई आणि ठाण्याच्या सभेत दिसल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला होते. मात्र काल राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात न दिसल्याने वसंत मोरे यांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर अखेरच्या क्षणी ते दौऱ्यात सहभागी झाले होते.
तसेच मोरे आज औरंगाबादला देखील जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यावर त्यांनी आपण उद्या औरंगाबादला (संभाजीनगर) येत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मोरे यांनी आपला शब्द खरा केला असून नाराजीच्या सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. वसंत मोरे नुकतेच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. शिवाय राज ठाकरे यांच्यासह व्यासपीठावर देखील ते दिसणार आहेत. स्वतः मोरे यांनी याबाबातची माहिती दिली आहे.
राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात वसंत मोरे अखेरच्या क्षणी प्रकटले :
काल औरंगाबादला जाण्याआधी राज ठाकरे पुण्यात आले होते. पुण्यात शंभर पुरोहितांकडून मंत्र पठण आणि गाड्यांवर फुलांचा वर्षाव असं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पण यात वसंत मोरे (Vasant More) कुठेच न दिसल्याने चर्चांना उधाण आले होतं. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना शहरातील सर्व पदाधिकारी हजर असतात. मात्र, राज ठाकरे आल्यापासून वसंत मोरे हे कुणालाही दिसलेले नव्हते.
या सगळ्यावर मोठी चर्चा सुरू झाल्यानंतर मोरे प्रकटले होते. ते थेट वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाथीस्थळी पोहचले. मनसेच्या काही नेत्यांकडून मोरे हे आजारी असल्याचे सांगितले जात होत. वढू येथे पोचल्यानंतरचा व्हिडीओही वसंत मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात त्यांच्याबद्दल अफवा पसरवणाऱ्या राजकीय विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी एकदम ठणठणीत आहे. माझ्या तब्येतीची काळजी करणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी कारण बाहेर ऊन खूप आहे ते सहन होणार नाही. मी उद्या श्री.छत्रपती संभाजी महाराज नगरला येतोय...! असेही त्यांनी सांगितले होते.
राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील भाषणानंतर मोरेंनी त्यांच्या प्रभागातील मशिदींमसोर भोंगे लावणार नाही,अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरुन दुर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे मोरे आता मनसेतून बाहेर पडतील, अशीही शक्यता वर्तविली जात होती. मात्र, यानंतर मोरेंनी शिवतीर्थवर जाऊन राज यांची भेट घेतली आणि आपण शंभर टक्के समाधानी झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे या सगळ्या वादावर पडदा पडला होता. त्यानंतर झालेल्या ठाण्याच्या सभेचं निमंत्रण राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिलं होतं. या सभेत वसंत मोरेंनाही सर्वांत आधी भाषण करण्याची संधी मिळाली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.