
महागाई वाढतं आहे, रूपया घसरत चाललाय. पण आम्हाला चिंता कशाची तर कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे? ताजमहालच्या खाली काय आहे, ज्ञानव्यापी मशिदीच्या खाली काय आहे? बरं आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण? तुम्हाला कोणी दिली फुटपट्टी? आणि असं आम्ही नेमकं काय केलं आहे की हिंदुत्व सोडलं असं बोंबलत सुटलाय? आणि मी मुंबईच्या सभेत बोललो होते ते पुन्हा एकदा बोलतो. चला एकदा होवून जावूद्या समोरासमोर. कोणी हिंदुत्वासाठी काय केले ते सांगायचे, असे म्हणतं राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिले.
मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना (ShivSena) संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त जाहिर सभेत उद्धव ठाकरे बोलत आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टिका केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपचे आमदार अतुल सावे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कात्रीत पकडले.
ठाकरे म्हणाले, बाबरी पडल्यावर यांची पळापळ झाली. पण आता फडणवीस सांगतात, शिवसेना तिकडे नव्हती. मग ज्या संभाजीनगरमध्ये मी आलोय, तिथे विचारा, आपले मोरेश्वर सावे जे महापौर होते, खासदार होते. ते आणि त्यांच्यासोबत शिवसैनिक बाबरी पाडायला गेले होते की नव्हते? आणि फडणवीसजी जर सावे तिकडे गेले नसतील तर तुमच्याकडे आलेले त्यांचे जे चिरंजीव, जे हिंदुत्वाच्याच मुद्दावर निवडून येत आता आमदार झालेत, त्यांनी सांगावं माझे बाबा गेले नव्हते. होवून जावूद्या एकदा खरं-खोटं, असे म्हणतं त्यांनी फडणवीस आणि आमदार अतुल सावे यांना कात्रीत पकडले.
कोणाला शिकवता हिंदुत्व? लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांची विधाने आहेत आणि हा सर्व आताचा इतिहास आहे. जर त्यावेळी बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली नसती, अमरनाथ यात्रेवर गंडांतर आले तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी वाघाची डरकाळी मारली नसती, कश्मिरी पंडितांच्या मागे शिवसेनाप्रमुख उभे राहिले नसते तर स्वतः ला विचारा, आज जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही दिल्ली काबिज केली आहे, ती करु शकला असता का? असा सवाल ठाकरे यांनी भाजपला केला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना राणा दाम्पत्यालाही लक्ष्य केले. ते म्हणाले, कश्मीर पंडितांवर पुन्हा तीच वेळ आली आहे. घरात, शाळेत, कार्यालयात जावून गोळ्या घालतं आहेत. कोणालाच काही पडले नाही. पण आम्हाला मात्र नको तिकडे काड्या करायच्या आहेत. त्याऐवजी जा ना, हिंमत असले तिकडे जाऊन हनुमान चालिसा पढा. काय दुधाचा अभिषेक करतायत, हनुमान चालिसा नाही वाचली तर हिंदुत्व नाही, सांगतायत. अरे हे नामर्दाचं हिंदुत्व आमचं नाही. हिंमत असेल तर तिकडे जा आणि काश्मिरी पंडितांचे रक्षण करा, असे आव्हानही ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला दिले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.