
औरंगाबाद : सामान्यांच्या जीवनातील अनेक प्रश्न आहेत, त्याचा केंद्र सरकारला कोणी जाब विचारू नये यासाठी विकृत मनोवृत्तीचे लोक महाराष्ट्र अशांत करत आहेत. विरोधकांनी आंदोलने करावीत मात्र समाजातील प्रश्नांसाठी, असा टोला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी विरोधकांना लगावला. बालविवाह रोखण्यासाठी गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी व रजिस्ट्रारवर गुन्हा दाखल करण्याचा कायदा करण्याची शिफारस करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Ncp)
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता.२६) महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुणवाईचे आयोजन करण्यात आले होते. या सुणवाईसाठी आल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. आता कुठे महाराष्ट्र कोरोना महामारीतुन बाहेर पडला आहे. (Marathwada) महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले दर असे अनेक प्रश्न आहेत, असे असताना या प्रश्नांचा केंद्राला कोणी जाब विचारू नये यासाठी शांत असलेल्या महाराष्ट्राला अशांत करण्याचे काम समाजातील काही विकृत मनोवृत्ती करत आहेत.
सत्तेत असताना पोलिसांचा वापर केला आणि आता त्याच पोलिसांची बदनामी करत आहेत. विरोधकांनी हे थांबवले पाहिजे. विरोधकांना आंदोलने करायचीच असतील तर त्यांनी समाजाच्या प्रश्नासाठी करावे, असा टोला देखील राणा दाम्पत्याला लगावला. खासदार सुजय विखे यांनी शिवसेना संपवण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर असल्याच्या केलेल्या आरोपाबाबत विचारले असता विरोधकांना रोज नविन स्क्रिप्ट मिळत असते त्यांना ते वाचून दाखवावे लागते. त्यानुसार ते अशी विधाने करत असतात. शिवाय अशी वक्तव्य केले तरचते चर्चेत राहू शकतात, त्यामुळे अशा वक्तव्यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे त्या म्हणाल्या.
औरंगाबाद जिल्ह्यात कुटूंबात हिंसाचार होत असेल तर काय करावे याबद्दल पुरेसे ज्ञान नसल्याने आणि पुरेसे अर्थिक पाठबळ नसल्याने कौटूंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. तसेच औरंगाबादमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले असून हा प्रश्न या जिल्ह्यात गंभीर बनला आहे. २०२० -२१ या काळात १०२ बालविवाह रोखण्यात आले आहेत. नोंद झालेल्यापेक्षा नोंद न झालेली संख्या जास्त आहे. वेळीच हे विवाह रोखले नाही तर भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होतील याविषयी चिंता व्यक्त करून बालविवाह रोखण्यासाठी लोकप्रतिनीधींनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
बालविवाह रोखण्यासाठी ज्या गावात बालविवाहाचा प्रकार झाला त्या गावातील सरपंच, तेथील लोकप्रतिनीधी आणि विवाहाची नोंद करणाऱ्या रजिस्ट्रारवर गुन्हे दाखल करण्याची तरतुद करणारा कायदा करण्याची आयोगाकडून शिफारस केली जाणार आहे.कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनीधींचा सहभाग खूप महत्वाचा असतो. त्यामुळे त्यांनीही बालविवाह रोखण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन देखील चाकणकर यांनी व्यक्त केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.