पोटनिवडणूक ःप्रचाराचा धुराळा थांबला ; आता विजयाचा गुलाल कोण उधळणार?

(Deglur-biloli by election)महाविकास आघाडीने देखील जातीय समीकरणे जुळवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. या शिवाय सुशिक्षित उमेदवार हा देखील त्यांच्या प्रचारातील मुद्दा होता.
Jitesh Antapurkar-Subhash Sabne
Jitesh Antapurkar-Subhash SabneSarkarnama

नांदेड ः देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा काल संध्याकाळी थांबला. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना यावेळी होणार आहे. भाजपकडून सुभाष साबणे तर महाविकास आघाडीकडून जितेश अंतापूरकर हे निवडणूक लढवत आहेत. उमेदवार हे दोघे असले तरी ही निवडणूक सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण विरुद्ध खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

भास्कर खतगावकर यांनी चिखलीकरांवर एकाधिकारशाहीचे आरोप करत केलेली घरवापसी भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. तर भावजी पुन्हा पक्षात आल्याने अशोक चव्हाण यांची ताकद वाढल्याचे चित्र आहे. सहानुभीतीची लाट विरुद्ध जातीय समीकरणे असे देखील या निवडणुकीचे वर्णन करता येईल. लिंगायत आणि धनगर समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात या दोन समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

ही मते आपल्याच पारड्यात पडावी यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीने पुरेपूर प्रयत्न केले आहेत. भाजपने कर्नाटकातील लिंगायत समाजाचे केंद्रात मंत्री असलेले खुबा यांना प्रचारात उतरवून या समाजाला आपल्या बाजुने वळवण्याचे प्रयत्न केले. तर गोपीचंद पडळकर यांच्या सभेतून धनगर समाजाला आकर्षित करण्याचे काम झाले. आता यात भाजपला किती यश मिळते ते २ नोव्हेंबरच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

महाविकास आघाडीने देखील जातीय समीकरणे जुळवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. या शिवाय सुशिक्षित उमेदवार हा देखील त्यांच्या प्रचारातील मुद्दा होता. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊन जितेश यांना संधी मिळायला हवी होती, महाराष्ट्राची ही परंपरा भाजपने मोडीत काढली हे देखील अशोक चव्हाण यांच्याकडून वारंवार सांगितले गेले.

भाजपने निवडणूक लादली, अंतापूरकरांना श्रद्धांजली म्हणून जितेशला निवडून द्या, असे भावनिक आवाहन करण्यावर देखील महाविकास आघाडीचा जोर होता. भाजपने ऐनवेळी उमेदवारी शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या साबणेंना दिली. त्यामुळे लिंगायत समाज भाजपवर नाराज असल्याची देखील चर्चा आहे. मात्र भाजप ही नाराजी दूर करण्यात यशस्वी होईल, असे देखील बोलले जाते.

वंचित आघाडी कुणाला धक्का देणार

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह १४ जण या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु महाविकास आघाडी आणि भाजप व्यतिरिक्त दखल घ्यावा असा तिसरा उमेदवार म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे डाॅ. उत्तम इंगोले. त्यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर, अंजली आंबेडकर यांनी मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या.

वंचितांना सत्तेची संधी हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा आंबेडकरांकडून केला गेला असला तरी त्यांचे मुख्य लक्ष्य हे अशोक चव्हाण हेच होते. आदर्शची फाईल बाहेर निघेल, असा प्रकाश आंबेडकरांनी दिलेला इशारा पाहता, वंचितला यश मिळाले नाही तरी चालेल, पण काॅंग्रेस विजयी होता कामा नये, यासाठीच त्यांची शक्तीपणाला लागणार एवढे मात्र निश्चित.

Jitesh Antapurkar-Subhash Sabne
भाजप म्हणते पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा; पुरावे द्या, नाहीतर माफी मागा शिवसेनेचे आव्हान

आता वंचित महाविकास आघाडीच्या मतांमध्ये किती वाटा घेते यावर जितेश अंतापूरकर यांचे विमान टेक आॅफ होणार की नाही? हे अवलंबून आहे. कुठल्याही निवडणुकीत प्रचार संपल्यानंतरचे दोन दिवस महत्वाचे समजले जातात. या दरम्यान, कोण, कशा तडजोडी करतो याचा परिणाम देखील निकालावर होणार आहे.

सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही पोटनिवडणुक आता अटीतटीची होण्याची शक्यता आहे. ३० आॅक्टोबरला ला मतदान आणि २ नोव्हेंबरला मतमोजणी असल्यामुळे आता कुणाच्या कपाळी विजयाचा गुलाल लागणार हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com