
Shivsena : गोपीचंद पडळकर हा छोटा कार्यकर्ता आहे, त्याला अजून खूप राजकारण कळायचंय. शरद पवार त्याला अजून माहित नाहीत, अशा शब्दात (Shivsena) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला उत्तर दिले. देशाचे पंतप्रधान आणि तुमच्या पक्षाचे नेते स्वतः बारामतीत जावून सांगतात, की शरद पवारांचे बोट धरून मी राजकारण शिकलो. तेव्हा शरद पवाराच्या नादी कोण लागलं आहे हे आधी नीट समजून घ्या, असा टोला देखील खैरेंनी लगावला.
आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी औरंगाबादेत शिवसेनेवर टीका करतांना पवारांच्या नादाला लागून ठाकरेंनी स्वतःचे नुकसान करून घेतले, अशी टीका केली होती. यावर (Chandrakant Khaire) खैरेंनी पडळकरांचा उल्लेख छोटा कार्यकर्ता असा केला.
खैरे म्हणाले, आम्ही पवारांच्या नादी लागलो असे म्हणणे चुकीचे आहे, तुमच्याच पक्षाचे सर्वोच्च नेते, देशाचे पंतप्रधान शरद पवारांचे बोट धरून मी राजकारण शिकलो असं सांगतात. त्यामुळे पवारांच्या नादाला आधी तुम्ही लागला होतात, पहाटेचा शपथविधी लोक अजूनही विसरलेले नाहीत हे लक्षात ठेवा. सभागृहात राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरच तुमचे सरकार तेव्हा तरले होते, याची आठवण देखील खैरेंनी पडळकरांना करून दिली.
शरद पवार काय आहेत, हे अजून पडळकरांना समजलेलेच नाही. त्यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले, तो पक्ष २५ वर्ष उभारी घेवू शकणार नाही, याची काळजी पडळकरांनी करण्याची गरज नाही. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते आणि लाखो शिवसैनिक समर्थ आहेत. तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा, असा सल्ला देखील खैरे यांनी पडळकरांना दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.