
Aurangabad Political : मकरसंक्रांती निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी आपल्या इमारतीच्या गच्चीवर पंतगबाजीचे आयोजन केले होते. या पंतगबाजीला सर्वपक्षीय राजकारणी दरवर्षी हजेरी लावत असतात. यंदा मात्र एकाच पतंगाची (Shivsena) शिवसेनेतील तीन नेते ओढाओढी करत असल्याचे चित्र पहायला मिळाले आणि उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले.
जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा दबदबा आहे. या दोन नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत इतरांना फारशी संधी मिळत नाही. राज्यातील सत्तांतर आणि शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेतील (Shivsena) अंतर्गत राजकारणाला आळा बसेल अशी अपेक्षा होती.
परंतु संकटात संधी म्हणतात तशी अंबादास दानवे यांना ती मिळाली आणि जिल्हाप्रमुख, आमदार असलेले दानवे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना मागे टाकून थेट पुढे निघून गेल्याचे सध्या चित्र आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाची दानवेंना संधी मिळाली आणि ते थेट राज्य स्तरावरील नेत्यांच्या रांगेत जावून बसले. महाविकास आघाडीतील आघाडीच्या नेत्यांसोबत त्यांची उठबस आणि निर्णय प्रक्रियेतील भूमिका महत्वाची ठरू लागली.
दानवेंना जसा शिंदे बंडाचा फायदा झाला, तसा तो खैरेंना देखील झाला. मातोश्रीने दुर्लक्ष केलेले खैरे पुन्हा प्रकाशझोतात आले, शिवसेना नेते म्हणून ते खऱ्या अर्थाने पुढे आले ते शिंदे बंडानंतरच. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देतादेता आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरचा त्यांचा दावा देखील पक्का झाल्याचे बोलले जाते.
तर भाजपमधून स्वगृही परतलेल्या खैरे समर्थक किशनचंद तनवाणी यांना देखील जिल्हाप्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळाली. महापालिका निवडणुका पाहता शहराची मिळालेली जबाबदारी त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी फायद्याची ठरणार आहे. असे असतांना आजच्या पतंगबाजीत मात्र या नेत्यांनी एकमेकांचा पतंग ओढण्यातच धन्यता मानली.
तनवाणी यांनी उडवलेला पतंग तिथे आलेल्या खैरेंनी आधी हिसकवला. त्यांची पतंगबाजी लयात असतांना अचानक अंबादास दानवेंनी तो ओढला. कुणाचा तरी पंतग काटण्याच्या तयारी असतांना खैरेंनी पुन्हा दानवेंच्या हातून पतंग ओढला आणि मी पेच लढवणार आणि पतंग काटणार हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
ही ओढाओढी सुरू असतांनाच पुन्हा आपल्या हातातील पंतग आणि त्याची डोर खैरे, दानवेंच्या हाती नको, म्हणून तनवाणींनी पुन्हा तो आपल्या हाती घेतला. या सगळ्या ओढाओढीकडे आमदार होण्याची इच्छा बाळगून असलेले माजी महापौर नंदकुमार घोडेले पाहत होते. आता या ओढाओढीत खरंच आपला नंबर लागणार का? याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.