
Osmanabad : पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्याविरोधात भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjeetsingh Patil) यांनी तक्रार केल्यानंतर सावंत यांनी विरोधी गटाच्या खासदार व आमदारांना सोबत घेऊन आपले मनसुबे स्पष्ट केल्याचे आज दिसून आले. शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त एकाच ठिकाणी हे तिन्ही नेते एकत्र आले होते, त्यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या पाठीवर हात ठेवून हात उंचावत सावंत यानी एकप्रकारे भाजपच्या आमदारांनाच आव्हान दिल्याची चर्चा सूरु झाली आहे. आता हा इशारा राणा पाटलांना आहे की मग ठाकरेंना हे लवकरच स्पष्ट होईल.
जिल्ह्याच्या राजकारणाला कधी काय वळण येईल हे सांगता येत नाही, त्याचाच प्रत्यय गेल्या काही दिवसापासून येत होता. (Shivsena) अगदी त्याचा सजिव देखावाच सावंत (Tanaji Sawant) यांनी दाखवून दिल्याने राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रा.सावंत यांच्या विरोधात १३ फेब्रुवारी रोजी तुळजापुरचे आमदार राणा पाटील यानी प्रधान सचिवांकडे तक्रार करत त्यांना आव्हान दिले होते.
त्यावर सावंत यांच्या गटानेही आमदार पाटील यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेऊन भुमिका जाहीर केली. दरवेळी विरोधकावर तुटून पडणाऱ्या भाजपच्या एकाही कार्यकर्त्यांने किंवा राणा पाटील यांच्या गटाने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. तोच आता सावंत याबाबतीत काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष होते. पण त्यानी प्रतिक्रिया न देता थेट कृतीतून उत्तर देत आपली भुमिका काय असणार हे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे हे सगळं घडलं ते राणा पाटील तिथे उपस्थितीत असतांनाच.
राज्याच्या राजकारणात भलेही भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाची युती असेल पण जिल्ह्यात मात्र त्याला काही प्रमाणात तडे गेल्याचे काही दिवसापासुन दिसु लागले आहे. त्याचे परिणाम पुढील काळात अधिक वेगळ्या पध्दतीने बघायला मिळणार का? हे पाहावे लागणार आहे. प्रा.सावंत यांच्या स्वभावाचा विचार केला तर ते कोणालाही जुमानत नाहीत, मग तो पक्षातील असेल की मित्रपक्षातील.
एखाद्या व्यक्तीबद्दल एकदा विरोधी भुमिका घेतली की, त्यांच्याशी कोणत्याही पध्दतीने ते जुळवुन घेत नसल्याचे चित्र आजवर पाहयला मिळाले आहे. त्यासाठी ते विरोधी गटाशी हातमिळवणी करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. त्याचा प्रत्यय त्यानी जिल्हा परिषदेच्या सत्तेत जाताना दाखवून दिले होते. आताही त्याचप्रकारे त्यानी भुमिका घेतल्याचे दिसू लागले आहे.
प्रा.सावंत व आमदार राणा पाटील यांच्यात आलेले वितुष्ट संपुष्टात येण्यासाठी राज्यस्तरावरुन प्रयत्न केले जातीलही पण सावंत यांच्या स्वभावाचा अंदाज असणाऱ्यांकडून शंका उपस्थित होत आहे. काही दिवसापुर्वी ज्या खासदार व आमदारावर प्रा.सावंत टिका करत होते त्यांच्यात आज अचानक असा बदल झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आता ठाकरेंच्या खासदार-आमदाराच्या खांद्यावर हात ठेवत सावंतांनी नेमका ठाकरेंना इशारा दिलायं की मग राणा पाटलांना ? हे लवकरच स्पष्ट होईल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.