Satish Chavan : आधी शिक्षकांवर लादलेली इतर कामे बंद करा, मग गुणवत्तेवर गप्पा झोडा...

प्रशांत बंब यांना शिक्षक, पदवीधर मतदारसंघ कालबाह्य वाटायला लागले आहेत. उद्या वरिष्ठ सभागृह असणारे विधान परिषद देखील त्यांना नको वाटेल. (Mla Satish Chavan)
Mla Satish Chavan-Prashant Bamb News Aurangabad
Mla Satish Chavan-Prashant Bamb News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेमधील शिक्षक मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याचे सांगत त्यांच्यावर रोष व्यक्त केला होता. आज त्यांनी शिक्षक व पदवीधर आमदार या शिक्षकांना पाठीशी घालतात त्यामुळे शिक्षक व पदवीधर मतदारसंघच बंद केले पाहिजे, अशी मागणी केली. खरे तर प्रशांत बंब (Prashant Bamb) यांची मागणी अत्यंत हास्यास्पद आहे.

जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांनी त्यांच्या मुख्यालयी वास्तव्यास राहिले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र मुख्यालयी राहण्यासाठी त्या शिक्षकांना राहण्या योग्य घरे, सोयीसुविधा आहेत का? याचा विचार आमदार महोदयांनी करायला हवा. (Marathwada) शिक्षक हे वेळेवर शाळेत येत असतील व विद्यार्थ्यांना ते गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतील तर आमदार महोदयांचा शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचा एवढा अट्टहास कशासाठी? असा सवाल मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण (Teacher) यांनी बंब यांना केला आहे.

ज्यांना आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देता आलेल्या नाहीत, त्यांनी शिक्षणाचे महत्व काय कळणार? असा टोला देखील चव्हाण यांनी बंब यांना लगावला आहे. आमदार प्रशांत बंब, शिक्षक आणि शिक्षक संघटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. यावरून आंदोलन, आरोप-प्रत्यारोप सुरु असतांनाच शिक्षकांची बाजू घेणाऱ्या शिक्षक व पदवीधर आमदारांची गरज राहिलेली नाही. त्यांचे मतदारसंघच रद्द करा, अशी खळबळजनक मागणी बंब यांनी केली.

यावर मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी तिखट प्रतिक्रिया देत बंब यांना सुनावले. प्रसिद्धी पत्रकाद्वारे बंब यांच्यावर टीका करतांना शिक्षकांनी मुख्यालयीच राहावे, हा त्यांचा मुद्दा देखील त्यांनी खोडून काढला. चव्हाण म्हणाले, अनेक शिक्षकांना कौटुंबीक अडचणीमुळे मुख्यालयी राहणे शक्य होत नाही याचा आमदार महोदयांनी विचार केला पाहिजे.

शिक्षकांनी मुख्यालयी राहण्यापेक्षा प्रशांत बंब यांनी त्यांच्या मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सोयीसुविधा, इमारतींची झालेली दयनीय अवस्था पहावी, व त्यावर सभागृहात आवाज उठवला असता तर निदान हा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली असती. खरे तर विद्यादानाचे पवित्र काम करणार्‍या शिक्षकांवर फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम नाही तर सरकार त्यांच्याकडून इतरही कामे करून घेतेच ना.

Mla Satish Chavan-Prashant Bamb News Aurangabad
Khaire : शहाजीबापू, भुमरे किरकोळ, त्यांच्यावर बोलून वेळ का वाया घालवू ?

कोरोना काळात डॉक्टर, पोलीस यांच्याबरोबरच शिक्षकांनी देखील स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. हे कादाचित आमदार महोदय विसरले असावेत. त्यामुळे आमदार महोदयांनी पहिल्यांदा आपल्या सरकारला शिक्षकांवर लादलेली अध्यापन बाह्य कामे पूर्णत: बंद करायला सांगावीत, जिल्हा परिषद शाळांना पूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास भाग पाडावे आणि मग शैक्षणिक गुणवत्तेबद्दल गप्पा झोडाव्यात.

आमदार महोदयांना माझी विनंती आहे की, त्यांनी एखाद्या खाजगी संस्थेकडून सर्वे करून घ्यावा की, जि.प.च्या शाळेत शिकलेले विद्यार्थी आज कुठे आहेत. समाजातल्या सर्वच क्षेत्रात जि.प.शाळेत शिकलेले विद्यार्थी अग्रेसर दिसतील. आणि ते मोठ्या अभिमानाने ही गोष्ट सांगतात. आता तर प्रशांत बंब यांना शिक्षक, पदवीधर मतदारसंघ कालबाह्य वाटायला लागले आहेत.

उद्या वरिष्ठ सभागृह असणारे विधान परिषद देखील त्यांना नको वाटेल. त्यामुळे अशा `उथळरावांनी` शिक्षक व पदवीधर आमदारांवर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे. शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न मांडायला आम्ही समर्थ आहोत, असा टोला देखील सतीश चव्हाण यांनी बंब यांच्या मागणीवर लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in