Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंनी फोन करून आमदारांना अयोध्येला जाण्यापासून रोखल...

काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. (Mla Sanjay Sirsath)
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंनी फोन करून आमदारांना अयोध्येला जाण्यापासून रोखल...
Cm Uddhav Thackeray News, Sanjay Shirsat NewsSarkarnama

औरंगाबाद : राज्यात सत्ता, शिवसेनेचा मुख्यमंत्री असून सुद्धा आम्हाला उद्धव साहेब तुमची भेट मिळत नव्हती. तुम्ही मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर कधी आला नाहीत, वर्षा बंगल्यावर आम्हाला प्रवेश नव्हता, मग आम्ही आमच्या व्यथा कुणाकडे मांडायच्या. (Shivsena) तेव्हा आम्हाला एकनाथ शिंदे यांचा आधार मिळाला, तिथे आमचे प्रश्न मांडायचो आणि ते सोडवले जात होते. तुमच्या अवतीभवती असलेल्या बडव्यांनी मात्र कायम आम्हाला तुमची भेट होऊ दिली नाही, बोलावले तरी तासनतास प्रवेशद्वारावर ताटकळत ठेवले जायचे, असा घणाघात करणारा लेटर बाॅम्ब बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. (Sanjay Shirsat News in Marathi)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल फेसबुकच्या माध्यमांतून शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बंडखोरांना उद्देशून निवेदन केले होते. त्यानंतर आज आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेले पत्र व्हायरल होत आहे. (Aurangabad) एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील आमदार, मंत्री आणि खासदारांचाही वाढता पाठिंबा पाहता शिरसाट यांनी पत्रात उपस्थीत केलेले मुद्दे महत्वाचे ठरतात.

एकाही आमदाराने मला तुम्ही मुख्यमंत्री नको असे सांगितले तर मी राजीनामा देईल, असे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थान सोडून आपला मुक्काम मातोश्रीवर हलवला. त्यावेळी शिवसैनिकांनाची मोठी गर्दी झाली होती. लोकांनी मुख्यमंत्र्यांसह कुटुंबियावर फुलांचा वर्षाव देखील केला. संजय शिरसाट यांनी लिहलेल्या सविस्तर पत्रात याचा देखील आवर्जून उल्लेख केला आहे.

संजय शिरसाट यांचे पत्र जसेच्या तसे..

काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) वडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं.

Cm Uddhav Thackeray News, Sanjay Shirsat News
आघाडी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न ; राष्ट्रवादीच्या आमदारांना आदेश

बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे ? हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती.

मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान.. आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घ्यायला लावला.

हिंदुत्व, अयोध्या राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं ? तुम्ही स्वतः फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या.

शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?

तुम्ही बोललांत पण, आमच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती..

साहेब, जेंव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातली कामं करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामं कशी होतात?

तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा. या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत आणि उद्याची राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं.

कळावे, लोभ असावा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in