माजी आमदार जाधवांची मतदारसंघात पुनर्बांधणी; निराधार महिलांचा मोर्चा काढला

(Ex.Mla Harshvardhan Jadhav) मतदारसंघातील निराधार, वयोवृद्ध महिलांना पेंशन मिळत नसल्याचा मुद्दा हाती घेत हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
माजी आमदार जाधवांची मतदारसंघात पुनर्बांधणी;  निराधार महिलांचा मोर्चा काढला
Ex.Mla Harshvardhan JadahavSarkarnama

औरंगाबाद ः कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुनर्बांधणी सुरू केली असून निराधार, वयोवृद्धांचा मोठा मोर्चा काढत तालुक्यात शक्ती प्रदर्शन केले आहे. मतदारसंघातील अनेक निराधार, वयोवृद्ध महिलांना पेंशन मिळत नसल्याचा मुद्दा हाती घेत हर्षवर्धन जाधव यांनी आज कन्नड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात हजारो महिलांनी सहभाग नोंदवत आपल्या मागण्या तहसिलदारांसमोर मांडल्या.

मोर्चाला उपस्थित महिलांची गर्दी पाहता तहसिलदारांनी कागदोपत्री पुर्तता केल्यानंतर सर्वांना नियमानूसार लाभ मिळेल असे आश्वासन दिले. एवढेच नाही तर कुणी माझे नाव सांगून पैसे मागत असेल, दलाली करत असेल तर माझ्याकडे थेट तक्रार करा, असे आवाहन देखील केले. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नव्याने मतदारसंघाची पुनर्बांधणी हाती घेतली आहे.

यापुर्वी देखील त्यांनी टोल, वीज, बियाणे, पीक कर्ज आदी विषय घेऊन तालुक्यात आंदोलने केली. अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान मतदारसंघात भाजपने संजना जाधव यांना आमदार करण्यासाठी सुरू केलेल्या हालचाली पाहता जाधव यांनी देखील ईशा झा यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आणण्यास सुरूवात केली आहे.

निराधार आणि वयोवृद्ध महिलांना पेंशन सुरू करण्यासाठी कन्नड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा आणि त्यात सहभागी होण्याचे आवाहन हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा यांच्यावतीने सोशल मिडियावर करण्यात आले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारोंच्या संख्येने महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. तहसिलदार स्वतः या मोर्चाला सामोरे गेले आणि त्यांनी लवकरच पात्र निराधार महिला व वयोवृद्धांची नावे नोंदंवून त्यांना योजनेचे सर्व प्रकारचे लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमवत हर्षवर्धन जाधव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील यानिमिताने केले. कौटुंबिक वाद आणि सलग दोन निवडणुकांमधील पराभवानंतर हर्षवर्धन जाधव हे काही काळ राजकारणापासून दूर गेले होते. परंतु ईशा झा यांच्या सोबत त्यांनी पुन्हा एकदा राजकारणात कमबॅक करत मतदारसंघात मेळावे, बैठका घेणे सुरू केले होते. कोरोना काळात यामध्ये काही प्रमाणात खंड पडला होता, परंतु त्या दरम्यान देखील वेरुळचे घृष्णेश्वर मंदिर खुले करण्यासाठी जाधव यांनी आंदोलन केले होते.

Ex.Mla Harshvardhan Jadahav
पाच किलोमीटरचा व्हीआयपी रस्ता, दोन हजार खड्डे; मनसेने घातले श्राद्ध...

२०१९ मध्ये खासदार होण्याचे स्वप्न भंगले आणि आमदारकीही गेली. त्यामुळे राजकारणात काहीसे मागे पडलेल्या जाधव यांनी पुन्हा एकदा भरारी घेण्याचा निर्धार केल्याचे दिसते. मतदरासंघात सुरू असलेली त्यांची मशागत भविष्यात त्यांना किती यश देते हे लवकरच स्पष्ट होईल.

Related Stories

No stories found.