
बीड : जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांकडून जनतेची घोर निराशा झाली आहे. कुठला निधी नाही की कामे नाहीत, त्यामुळे त्यांना मतदान करण्याची मानसिकता मतदारांमध्ये नाही. (Beed News) तुमच्यासाठी मी रणांगणात उतरले आहे, जिल्हा परिषद जिंकण्यासाठी आतापासूनच कामाला लागा. पुन्हा आपलीच निर्विवाद सत्ता येणार आहे, असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला.
विधान परिषद निवडणुकीत भाजप (Bjp) नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारीची समर्थकांची अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर त्यांनीही याबाबत थेट प्रतिक्रीया दिली नव्हती. या प्रक्रीयेनंतर आमदार सुरेश धस, आमदार नमिता मुंदडा, रमेशराव आडसकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मुंबईत त्यांची भेट घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात दौरा करण्याची मागणी केली होती. त्यामुळे जिल्ह्यात प्रथमच येत असलेल्या पंकजा मुंडे काय, बोलणार याकडे लक्ष लागले होते.
मंगळवारी आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक आष्टी येथे झाली. पंकजा मुंडे म्हणाल्या, आष्टी हा जिल्हयात सर्वाधिक ताकदीचा मतदारसंघ आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी मी इथूनच सुरू करत आहे. पालकमंत्री म्हणून जातीसाठी नाही तर मातीसाठी काम केलं, कुठलाही भेदभाव केला नाही. ग्रामीण भागात रस्ते, पाणी, वीज या मुलभूत समस्यांसह विविध विकास कामे केली.
शेतकरी वर्ग माझ्या काळात आनंदी होता, पण आज परिस्थिती उलट आहे. सत्ताधाऱ्यांचे जिल्हयाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. माझ्या काळात जो निधी आला, त्याचीच कामे आणि उदघाटने आजही सुरू आहेत. विम्याचा तसेच वीज बिल वसुलीचा प्रश्न गंभीर बनल्याने शेतकरी चिंतातूर आहे. माझा विरोध अथवा टिका ही कधीही एखाद्या व्यक्ती विरूध्द नाही तर प्रवृत्ती विरूध्द असते. जिल्ह्यात सर्वच बाबतीत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपण पूर्ण लक्ष घालणार आहोत, त्यासाठी प्रत्येक गटाचा दौरा करणार आहे. सर्वांनी एकत्रित काम करावे, असा कानमंत्रही त्यांनी दिला. विरोधकांना आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला सुध्दा माणूस मिळाला नाही पाहिजे. निवडणुकांना जिंकण्याच्या इर्षेने यशस्वीपणे कामाला लागा असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.