
Shivsena UBT News : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील सरकार येत्या १६ रोजी छत्रपती संभाजीनगरात मंत्रीमंडळ बैठक घेत आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच अशी बैठक होत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मराठवाड्यात मंत्रींडळ बैठक झाली होती. या निमित्ताने त्या बैठकीत मराठवाड्यासाठी घेतलेले निर्णय आणि निधीची केलेली घोषणा याची आठवण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve News) यांनी करून दिली आहे. मराठवाड्यासाठी फडणीवसांच्या मंत्रीमंडळाने तेव्हा तब्बल ४९ हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. त्याचे काय झाले? असा सवाल दानवे यांनी या निमित्ताने उपस्थीत केला आहे.
मराठवाड्यासाठी २०१६ साली शेवटची कॅबिनेट बैठक तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) सरकारने संभाजीनगरला घेतली होती. आजही ते 'सुपर सीएम' च्या भूमिकेत या खोके सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांनी ४९०२० कोटींची घोषणा केवळ मराठवाड्यासाठी केली होती. (Marathwada) त्यावेळी झालेल्या घोषणांपैकी जवळपास सगळ्याच अपूर्ण आहेत. काही मोजक्या घोषणांबाबत मी आज विचारतो आहे, असे म्हणत त्यांनी काही प्रश्न उपस्थीत केले आहेत.
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगरातील घोषित स्मारकाचे काम किती वर्षे चालणार?
- धाराशिवच्या तेर येथे वस्तुसंग्राहलयसाठी घोषित आठ कोटींचे काम अजूनही सुरूच आहे. भीक देत आहात का?
- सुमारे ४५० कोटींच्या म्हैसमाळ विकास आराखड्याचे काय झाले? आज तिथे जाण्यासाठी नीट वाटही उरलेली नाही.
- नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या विकासासाठी घोषित सुमारे २५० कोटी कुठे आहेत? भंपक वागण्यातून देव देवतांना तरी सोडा?
- लातूरला विभागीय क्रीडा संकुल दिले होते. ते आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बांधणार आहात का?
- मराठवाड्यात डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून १००० गावात दूध योजना आणून १.२५ लाख लोकांना रोजगार देणार होतात. योजना नक्की मराठवाड्यासाठीच होती की विदर्भासाठी?
- संभाजीनगरातील करोडीला ट्रान्सपोर्ट हब बनवणार होतात. अजून जमीन सापडली नाही का?
- परभणी येथे ६८ एकरावर टेक्स्टाईल पार्क उभारणार होतात? तुमच्या अधिकाऱ्यांनी साधी जागा तरी पाहिली आहे का या प्रकल्पासाठी?
- मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना कुठे बारगळली? आज मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या काळ्या छायेत गेला आहे.
- कृष्ण-मराठवाडा सिंचन योजनेसाठी ४८०० कोटी देणार होतात. किती कवड्या दिल्या, काम किती झाले?
- 'इतर' सिंचन प्रकल्पांसाठी १०४८ कोटी देणार होतात? हे 'इतर' कोणते आणि त्याला किती निधी दिला?
- नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी २८२६ कोटींची कबुली होती. किती निधी दिलात, कारण प्रकल्प अजूनही अपूर्णच आहे.
- विमानतळ विस्तारीकरणासाठी २०० कोटीची घोषणा केलीत. विस्तार होत राहील, विमानांची नवीन शहरांशी जोडणी संभाजीनगरला मिळावी यासाठी साधे पत्र तरी लिहिले का?
- संभाजीनगर पॉलिटेक्निकला अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी एक कोटी. सध्याचा गव्हर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने अनेक विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अजून एक कॉलेज देऊन तिथे काय पाहायचे? नुसत्या भिंती?
- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाच्या संस्थेला २७९ कोटी देणार होतात. प्रत्यक्षात मंजूर केले फक्त १२ कोटी. किमान तुमच्याच पक्षाचे गोपीनाथ मुंडे यांचे तरी व्हा?
- ग्रामीण भागात १.२१ लाख घरे (१८० कोटी खर्चून) बांधणार होतात. किती लोकांना छप्पर मिळाले, जरा सांगता का?
- २५ हजार हेक्टरवर फळबागा उभारण्यासाठी ३७५ कोटींची कबुली होती. आज ती झाडे मोठी झाली असतील ना? जरा सांगता का, ही बाग नेमकी कुठे आहे?
- जालन्यात सीड पार्क साठी १०९ कोटींचा वायदा होता. तुमच्या या घोषणेची वाट पाहून आज सीड कंपन्यांची मुख्यालये हैद्राबादला स्थलांतरित होत आहेत.
यंदा नव्या घोषणांच्या पूर्वी जुन्या यादीचे काय झाले हे पण आपण सांगाल, अशी अपेक्षा मराठवाड्याच्या जनतेला आहे. यंदा संभाजीनगरात येत असताना घोषणा जरा जपूनच करा. कारण आपल्या खोकेबाजीची, धोकेबाजीची नोंद तब्बल ३२ देश घेत असतात, असं म्हणतात. तुमच्या दिल्लीश्वर 'पातशहा' यांना सवय आहे शब्द फिरवायची/विसरायची. तीच तुम्हालाही लागली आहे, असा टोला देखील दानवे यांनी लगावला आहे.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.