Bharat Jodo Yatra In Mahrashtra News, Aurangabad
Bharat Jodo Yatra In Mahrashtra News, AurangabadSarkarnama

Marathwada : `भारत जोडो`च्या निमित्ताने नांदेड लोकसभेसाठी चव्हाणांना बळ देण्याचा प्रयत्न..

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात आणि राज्यात देखील मोदी लाटेत बहुतांश मतदारसंघ वाहून गेले, तिथे अशोक चव्हाण यांच्या नांदेडने मात्र या लाटेवर स्वार होत विजय मिळवला होता. (Ashok Chavan)

नांदेड : मराठवाड्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा जिल्हा म्हणून नांदेड ओळखला जातो. स्व. शंकरराव चव्हाणांपासून ते आता त्यांचे राजकीय वारसदार असलेल्या अशोक चव्हाणांनी कायम या जिल्ह्यावर आपली पकड ठेवली. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये देखील कायम काॅंग्रेसचा वरचष्मा राहिलेला आहे. लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथे काॅंग्रेसने सर्वाधिक वेळा विजय मिळवलेला आहे.

Bharat Jodo Yatra In Mahrashtra News, Aurangabad
Amar Rajurkar : तेव्हा सत्तार बरे होते, तिकडे जाऊन बिघडले ; खोटंही बोलायला लागले..

हा एक असा मतदारसंघ आहे ज्यावर कुठल्याही लाटेचा परिणाम होत नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात आणि राज्यात देखील मोदी लाटेत बहुतांश मतदारसंघ वाहून गेले, तिथे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नांदेडने मात्र या लाटेवर स्वार होत विजय मिळवला होता. तेव्हा काॅंग्रेसला राज्यातील ४८ पैकी केवळ नांदेड (Nanded) आणि हिंगोली या दोन जिल्ह्यातच विजय मिळवता आला होता.

२०१९ च्या निवडणुकीत मात्र या दोन्ही मतदारसंघातील गणित बिघडले. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने एमआयएमसोबत केलेल्या युतीने या दोन्ही मतदारसंघामध्ये काॅंग्रेसला पराभव पत्करावा लागला. भाजपचे देशातील सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या पक्षाने काॅंग्रेसमुक्त भारत करण्याचा विडा उचलला आहे. लोकसभेत काॅंग्रेसला विरोधी पक्षनेता देखील करता आला नाही, इतकी वाईट अवस्था या पक्षाची झाली.

पण असे असतांना काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी भाजप सरकारच्या विरोधात एल्गार पुकारत कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंत `भारत जोडो` ही तीन हजार किलोमीटरची यात्रा सुरू केली आहे. देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थीती पाहता त्यांच्या या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राहूल गांधी यांनी देशातील वातावरण ढवळून काढायला सुरूवात केलेली असतांना येत्या ७ नोव्हेंबरला तेलंगाणा राज्यातून भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे.

योगायोग म्हणा की मग भविष्यातील राजकीय गणित पण ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे ती अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातून. देगलूरमार्गे राहूल गांधी यांचा हा झंझावात चार दिवस नांदेड जिल्ह्याच्या विविध भागात असणार आहे. १२४ किलोमीटर क्षेत्रातून ही यात्रा आणि राहूल गांधी यांचा करिश्मा अनुभवायला मिळणार आहे. एकीकडे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या आणि त्यांच्याच जिल्ह्यातून राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे मार्गक्रमण हा निव्वळ योगायोग निश्चितच नाही.

Bharat Jodo Yatra In Mahrashtra News, Aurangabad
Marathwada : नांदेड, हिंगोली जिल्ह्यात आठवडाभर असणार भारत जोडो यात्रा..

२०१४ च्या मोदी लाटेत भाजपला पाणी पाजणाऱ्या अशोक चव्हाणांना आगामी लोकसभा निवडणुकीत बळ देण्याचा प्रयत्न म्हणून देखील याकडे बघितले जात आहे. मोदी लाटेत काॅंग्रेसची अब्रू वाचवण्याचे काम मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोल या दोन मतदारसंघांनी केले होते. नेमक्या याच दोन मतदारसंघात प्रत्येकी चार दिवसांचा मुक्काम भारत जोडोचा असणार आहे. अशोक चव्हाण हे काॅंग्रेसशी एकनिष्ठ असणारे राज्यातील मोठे नेतृत्व आहे.

पक्षाला राज्यात नव्याने उभारी द्यायची असेल तर चव्हाणांना ताकद देणे गरजेचे आहे, म्हणूनच राहूल गांधी यांच्या यात्रेचा मार्ग नांदेडमधून आखण्यात आल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काॅंग्रेसला नवसंजीवनी मिळाली. महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहूल गांधी व प्रियंका गांधी यांना राजी करण्यात अशोक चव्हाण यांची महत्वाची भूमिका होती.

Bharat Jodo Yatra In Mahrashtra News, Aurangabad
Abdul Sattar : दोन दिवसांत तुम्ही वरळीतून राजीनामा द्या, मी सिल्लोडमधून देतो..

त्यामुळे देशाच्या राजकारणात कमबॅक करायचे असेल तर काॅंग्रेसला एक एक मतदारसंघ नव्याने बांधावा लागणार आहे. भारत जोडो यात्रा हा त्यासाठीचाच उपक्रम आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. नांदेड लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये अशोक चव्हाण ८१ हजार मतांनी विजयी झाले होते. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या प्रा. यशपाल भिंगे यांनी तब्बल १ लाख ६६ हजार मते मिळवल्याने अशोक चव्हाण यांचा ४० हजार मतांनी पराभव झाला होता.

भाजपने ही जागा जिंकली होती. काॅंग्रेसचा मतदार चव्हाणांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे या निवडणुकीत देखील दिसून आले होते, पण दलित, मुस्लिम मते वंचितकडे वळाल्याने चव्हाणांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता हीच गमावलेली मुस्लिम, दलित मते पुन्हा काॅंग्रेसकडे वळवून नांदेड लोकसभेची जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने भारत जोडोच्या निमित्ताने टाकलेले हे पाऊलच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com