..ना संभाजीनगरची घोषणा, ना पाणी प्रश्नावर ठोस उत्तर ; `स्वाभीमान` सभेतही औरंगाबादकरांची झोळी रिकामीच...

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला साजेसे असे शहर करत नाही तोपर्यंत नाव बदलणार नाही, असे स्पष्ट करत ठाकरेंनी मुंबई प्रमाणेच इथेही शहराच्या नामंतराला बगल दिली. (Cm Uddhav Thackeray)
Chief Minister Uddhav Thackeray Rally in Aurangabad News
Chief Minister Uddhav Thackeray Rally in Aurangabad NewsSarkarnama

औरंगाबाद : शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादेतील `स्वाभीमान` सभेकडे संपु्र्ण राज्याचे लक्ष लागले होते. ज्या शहराच्या महापालिकेत गेली २५ वर्ष शिवसेनेची एकहाती सत्ता होती, ज्या औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर नामांतर करण्याच्या वारंवार दिलेल्या वचनाच्या जोरावर ही सत्ता मिळवली त्या शहराचे नाव मुख्यमंत्री पद मिळाले तरी शिवसेनेला (Shivsena) बदलणे शक्य नाही हे ठाकरेंच्या भाषणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

सत्ता असून शहवासियांना १० दिवसाला पाणी मिळते, यावरून विरोधकांनी शिवसेनेची कोंडी केली, त्या पाणी प्रश्नावर देखील मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) ठोस आश्वासन, शब्द नागरिकांना देता आला नाही. शिवगर्जना, स्वाभीमान सभा असे वर्णन करण्यात आलेल्या आणि पाऊण तास केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून औरंगाबादकरांची झोळी पुन्हा एकदा रिकामीच राहीली, आश्वासनांपलिकडे त्यांच्या नशिबी काहीच पडले नाही, असेच ठाकरेंच्या सभेचे वर्णन करावे लागेल.

१ मे रोजी झालेली राज ठाकरे यांची सभा, त्यानंतर २३ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाणी प्रश्नावर काढलेला जल आक्रोश मोर्चा याला उत्तर म्हणून या सभेकडे पाहिले गेले. गेली दोन आठवडे या सभेची जय्यत तयारी, नियोजन सुरू होते. मुख्यमंत्री स्वतः येत असल्यामुळे आज काहीतरी महत्वाची घोषणा, ठोस शब्द मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. सभेला गर्दी जमली, पण ना संभाजीनगरची घोषणा झाली, ना पाणी कधी मिळणार याचे उत्तर मिळाले.

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. भाषणातील अर्धावेळ त्यांनी औरंगाबादकरांना काय देणार? कागदावर कसा विकास सुरू आहे, तो लवकरच कसा प्रत्यक्षात येईल हे सांगण्यात खर्ची केला. तर उर्वरित अर्ध्या वेळ त्यांनी हिंदुत्व, भाजपवर टीका, केंद्र सरकारच्या चुकीची धोरण यावर टीका करण्यात घालवली. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते संजय राऊत यांची भाषणे आधी झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणात देखील तेच मुद्दे आले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः देखील याचा उल्लेख आपल्या भाषणात केला.

Chief Minister Uddhav Thackeray Rally in Aurangabad News
हातात दांडकं घ्या अन् संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाआड येणाऱ्यांना बाजूला करा : उद्धव ठाकरे

होय संभाजीनगरच असं छातीठोकपणे शिवसेनेचे नेते सभेपुर्वी सांगत होते. त्यामुळे मुख्यमंत्री आजच्या सभेतच संभाजीनगरची अधिकृत घोषणा करतात की काय ? असे वातावरण तयार करण्यात आले होते. प्रत्यक्षात छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला साजेसे असे शहर करत नाही तोपर्यंत नाव बदलणार नाही, असे स्पष्ट करत ठाकरेंनी मुंबई प्रमाणेच इथेही शहराच्या नामंतराला बगल दिली.

त्याऐवजी आम्ही चिकलठाणा विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा ठराव विधानसभेत करून तो केंद्राकडे पाठवला आहे. भाजपवाल्यांनी तो केंद्राकडून मंजुर करून आणावा, असे म्हणत संभाजीनगरचा विषय टोलवला. शहरातील पाणी प्रश्नावर आपण कसे आक्रमक झालो आहोत, कंत्राटदाराची गय करणार नाही, आता पाण्याची परिस्थिती सुधारली आहे, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली.

शहरातील रस्त्यांसाठी निधी दिला आहे, मराठवाड्याता मोठे उद्योग येत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण केला, पर्यटनस्थळे, पुरातन मंदिरांचा विकास करतो आहोत, सफारी पार्क तयार होत आहे, असे सांगत त्यांनी औरंगाबादकरांना पुन्हा एकदा भविष्यातील विकासच दाखवला. भाजपचा आक्रोश हा पाण्यासाठी नाही, तर सत्तेसाठी होता, असे सांगत ठाकरे यांनी या मोर्चाची खिल्ली उडवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com