
Jalna News : राष्ट्रवादीतील फूट ही फूट नाही, तर मंत्रीमंडळात मंत्री झालेले नऊ नेतेच आम्हाला सोडून गेले, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. त्यानंतर अजित पवार आमचे नेते आहेत, असे म्हणत शरद पवारांनी देखील गोंधळात टाकणारे वक्तव्य केले. यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मात्र आता माघार नाही, पुढेच जाणार, असे स्पष्ट केले.
जालना येथे माध्यमांशी बोलतांना तटकरे यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. बीडसह इतर ठिकाणी होणाऱ्या सभा या शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठीचा नाहीत, तर आमचे उत्तरदायित्व सांगणाऱ्या आहेत, असेही तटकरे म्हणाले. राष्ट्रवादीतील बंडानंतर दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. शरद पवार राज्यभरात स्वाभीमान सभा घेऊन पक्ष मजबुत करण्यासाठी फिरत आहेत. तर त्याला प्रत्त्युतर देण्यासाठी अजित पवार गटाकडूनही पाठोपाठ सभांचे आयोजन केले जात आहे.
शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे यांनी अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीतील बंडाबद्दल घेतलेल्या भूमिकेने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. मात्र, आता माघार घेणार नाही, पुढेच जाणार अशी सडेतोड भूमिका तटकरे यांनी घेतली. आम्ही आता 'एनडीए'तील घटक पक्ष आहोत, घटकपक्ष म्हणूनच निवडणुका लढवू. लोकसभा जागा वाटपाचा प्रश्न देशपातळीवरचे वरिष्ठ नेते घेतील. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी भूमिका घेतली, त्यावर राष्ट्रीय निवडणूक आयोग लवकरच शिक्कामोबर्तब करेल, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.
आमच्या नेत्यांच्या सभांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा दावा करतांनाच आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांच्या टीकेचा दाखला देत दिला. शरद पवार, अजित पवार एकत्र येतील का ? या प्रश्नावर काळाच्या उदरात काय दडलंय मला माहित नाही, असे म्हणत त्यांनी सस्पेन्स वाढवला.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.