Nanded District APMC News : दोन खासदार, एक आमदार तरी, अशोक चव्हाण युतीला ठरले भारी...

Ashok Chavan : युतीच्या पॅनेलची धुरा खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांभाळली.
Nanded District APMC News
Nanded District APMC NewsSarkarnama

Marathwada : मराठवाड्यातील एक मोठी आणि महत्वाची बाजारपेठ असलेल्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार (Nanded District APMC News) समितीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक हाती सत्ता मिळवली. त्याचबरोबर जिल्ह्यातील भोकर आणि हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा काॅंग्रेसने वर्चस्व मिळवले. अशोक चव्हाण यांनी भोकर तर आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगरचा गड राखला. कुंटुरमध्ये मात्र उमेदवार जाहीर झाल्यानंतर युतीवर तोडगा काढण्यात आला आणि एक दुसऱ्याला पाठिंबा देवून काँग्रेस - भाजपची युती झाली आणि युतीच्या सर्वच्या सर्व १७ उमेदवाराचा एकतर्फी विजय झाला.

Nanded District APMC News
Chhatrapati Sambhajinagar APMC News : वज्रमुठ सुटली, शिंदेंच्या शिलेदारांनी गड राखले..

जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपैकी नायगाव बाजार समिती निवडणुक बिनविरोध झाली. त्यात काँग्रेस आणि भाजपने जागा वाटून घेत निवडणुक बिनविरोध काढली. भोकर, हिमायतनगर आणि कुंटुर या तीन तर रविवारी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी झाली आणि (Pratap Patil Chikhlikar)खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्यासह एक आमदार अशोक चव्हाणांपुढे निष्प्रभ ठरले.

हिमायतनगरला काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी `एकला चलो रे` म्हणत सर्व विरोधकांना धूळ चारत सर्वच्या सर्व १८ जागा जिंकून एकहाती सत्ता प्रस्थापित केली. (Nanded) उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर तसेच बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी भाजपला सोबत घेऊन मोठे आव्हान उभे केले. मात्र या प्रतिष्ठेच्या लढतीत आमदार जवळगावकर विजेते ठरले अन् विरोधक चारीमुंड्या चित झाले.

या ठिकाणी आष्टीकर आणि कदम कोहळीकर एकत्र आले असते तर चित्र वेगळे राहिले असते. कुंटूरमध्ये मात्र ऐनवेळेस दगाफटका होण्याचे संकेत मिळाल्याने भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधत युतीवर तोडगा काढण्यात यश मिळवले. काँग्रेस-भाजपची युती होऊन सर्वच्या सर्व १७ उमेदवारांचा एकतर्फी विजय झाला. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने नायगाव आणि कुंटुरला `सोयीचे राजकारण` पहायला मिळाले. नांदेडला महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधत एकतर्फी विजय प्राप्त केला.

युतीच्या पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांभाळली होती. दोन खासदार व एका आमदाराला अशोक चव्हाण भारी पडले असून नांदेडचा सात - बारा पुन्हा एकदा आपल्याच नावाने आहे, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. मतदारांनी चव्हाण यांना दिलेला शब्द पाळला. नांदेड बाजार समितीवर दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता राहिली आहे.

Nanded District APMC News
Parbhani District APMC : बेबनाव, तरी नेत्यांनी आपापले गड राखत आघाडीला ताकद दिली..

या बाजार समितीचे कार्यक्षेत्र नांदेड, अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील काही गावात आहे. या तिन्ही तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या तालुक्यातील बहुतांश सेवा सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आहेत. शिवाय संघटनात्मक काम असल्यामुळे त्याचा फायदा झाला. तसेच अशोक चव्हाण बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नांदेडमध्ये तळ ठोकून होते. मतदान दोन दिवसांवर आले असताना चव्हाण यांनी गावनिहाय मतदारांच्या भेटी घेतल्या व मतदारांकडून शब्द घेऊन पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन केले.

प्रत्येक बाजार समितीची जबाबदारी विश्वासू पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली. उमेदवार निवडीपासून ते निवडणूक प्रचार संपेपर्यंत सुक्ष्म नियोजन केल्यामुळे विजय सुकर झाला. नांदेड बाजार समितीत महाविकास आघाडीचा प्रयोग प्रथमच करुन तो यशस्वी करण्यासाठी स्वतः अशोक चव्हाण यांनी लक्ष घातले. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या तेरा जागांसाठी तब्बल आठ नवीन चेहऱ्यांना संधी देऊन प्रस्थापितांना धक्का दिला. तरुण पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी दिली व या संधीचे सोने झाले.

Nanded District APMC News
Dharashiv District APMC: महाविकास आघाडीला मिळालेले यश, सत्ताधारी आमदारांसाठी धोक्याची घंटा ?

हमाल मापाडी गटातील एक उमेदवार वगळता सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा देण्यात आल्या होत्या. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर‌ यांचा जुना व मुरब्बी नेता आघाडीच्या पॅनेलमध्ये असल्याने नांदेड तालुक्यात पॅनेलला बळ मिळाले. तसेच अन्य दोन उमेदवार निवडून आले आहेत. बाजार समितीमध्ये शिवसेनेचे दोन ते तीन सदस्य नेहमी राहिले आहेत.

सेनेच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. यात जिल्हाप्रमुख बबन बारसे यांनी आपले राजकीय कौशल्य व संपर्काचा उपयोग करून बिनविरोध निवडून आले. तर मितभाषी म्हणून ओळखले जाणारे शिवसेना जिल्हाप्रमुख सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील डक यांनी नांदेड तालुक्यात नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविली. याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. त्याचबरोबर श्यामराव पाटील टेकाळे, भगवानराव पाटील आलेगावकर हे दोन माजी सभापती विजयी झाले. तसेच नवीन बारा चेहऱ्यांना संधी मिळाली.

मतदारांना परिवर्तन आवडले नाही

या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर आदी नेत्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना परिवर्तनाची हाक दिली. पण मतदारांनी परिवर्तन सोडून शेतकरी विकासाला प्राधान्य दिले आहे. थोडक्यात मतदारांना परिवर्तन नको होते. या निवडणुकीत युतीचे खातेही उघडले नाही.

या निवडणुकीसाठी प्रचाराचे नियोजन, जनसंपर्क, सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत ज्यावेळी निवडणूक होतात त्यावेळी लक्ष देण्याची गरज आहे. ऐनवेळी पॅनेल तयार करुन निवडणूक लढविली की यश मिळत नाही हे या निमित्ताने दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात खासदार चिखलीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सूक्ष्म नियोजन करणे भाग आहे नाही तर पराभव ठरलेलाच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com