
Hingoli : शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर राज्यभरात ठाकरे गटाकडून शिवगर्जना अभियान सुरू आहे. या शिवगर्जनेतून विरोधकांवर तुटून पडत असतांनाच परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी आपल्याच नेत्यांना आरसा दाखवण्याचे काम देखील केले. उद्धव साहेब तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर पारोला मंत्री करायचं नसतं. अडीच वर्षाच्या सत्तेत जो वाटा मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही, तुमचे दुर्लक्ष झाले आणि त्यामुळेच चाळीस चोरांना संधी मिळाली, असा घरचा आहेत जाधव यांनी ठाकरेंना दिला.
हिंगोली (Hingoli) येथील शिवगर्जना मेळाव्यात जाधव बोलत होते. गद्दारी का झाली, शिंदेंनी पक्ष कशामुळे फोडला हे सांगत असतांना जाधव यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्या मंत्रीपदाकडे बोट दाखवले. संजय जाधव म्हणाले, उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री व्हायचे होते, तर त्यांनी पोराला मंत्री करायला पाहिजे नव्हते. अन् जर पोराला मंत्री करायचे होते, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे नव्हतं.
दोन मंत्रीपदाच्या खुर्च्या अडकवल्यामुळे गद्दारी झाली. बाप गेला तरी पोरगा माझ्या डोक्यावर बसणारच आहे, हे लक्षात आल्यामुळेच एकनाथ शिंदेंनी बंड केले. आघाडी सरकारच्या सत्तेमध्ये जो वाटा आपल्याला मिळायला हवा होता, तो मिळाला नाही ही वस्तुस्थिती देखील मला सांगितली पाहिजे. दोघेही मंत्री झाल्यामुळे उद्धवसाहेबांचे दुर्लक्ष झाले, त्यांना लक्ष देता आले नाही, त्यामुळेच चाळीस चोरांना संधी मिळाली.
एकनाथ शिंदेंना वाटलं बाप नसला तरी पोरगा माझ्या मुंडक्यावर आहेच, त्यापेक्षा वेगळी चूल मांडलेली बरी, म्हणून ही परिस्थिती ओढावली. पण ज्या बाळासाहेबांनी तुमच्याजवळ काही नसतांना तुम्हाला सगळं काही दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे असलेले नगरविकास खाते तुम्हाला दिले, त्यानंतरही तुम्ही गद्दारी केली. आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात कोणत्याच मुख्यमंत्र्याने नगरविकास खाते दुसऱ्या कुणाला दिले नव्हते, ते तुम्हाला दिले तरी तुम्ही गद्दारी केली, अशी टीका देखील जाधव यांनी यावेळी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.