Latur : रितेश-जेनेलियाच्या कंपनीला एमआयडीसीत भूखंड अन् कोट्यावधींचे कर्जही..

२०१९ एमआयडीसीकडे भूखंड मागणीचे एकूण १६ प्रस्ताव प्रलंबित होते. परंतु रितेश-जेनेलिया यांच्या कंपनीला एमआयडीसीने भूखंड मंजूर करून त्याचा ताबा देखील २२ जुलै २०२१ रोजी दिला. (Latur News)
Actor Ritesh and Genelia Deshmukh News, Latur
Actor Ritesh and Genelia Deshmukh News, LaturSarkarnama

लातूर : लातूरमध्ये एमआयडीसीतील भूखंड वाटपात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीला एमआयडीसीने प्राधान्य क्रम डावलून भुखंडाचे वाटप आणि त्यासाठी तातडीने कर्ज मंजुर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेल्या अमित देशमुख (Amit Dehsmukh) यांनी सत्तेचा दुरूपयोग करत आपल्या भाऊ आणि वहिणीला (Latur) लातूर एमआयडीसीत कंपनीसाठी भूखंड आणि कोट्यवधीचे कर्ज मंजुर करून दिल्याचा आरोप भाजपचे गुरुनाथ मगे आणि ॲड. प्रदीप मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. (Marathwada)

Actor Ritesh and Genelia Deshmukh News, Latur
Marathwada : हृदयविकाराचा धक्का शिरसाटांना, पण वेदना शिंदेंना..

लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर कायम गढीचे वर्चस्व राहिलेले आहे. साखर कारखानदारी, जिल्हा बॅंक आणि राज्याच्या सत्तेत कायम मंत्रीपद मिळवलेल्या देशमुख कुटुंबाकडेच जिल्ह्याच्या सत्तेची सुत्र कायम राहिली आहेत. आमदार अमित, धीरज देशमुख यांचे अभिनेता असलेले बंधू रितेश आणि वहिनी जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीसाठी तत्कालीन पालकमंत्री राहिलेल्या अमित यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप होत आहे.

रितेश-जेनेलिया हे देश ऍग्रो प्रा. लि. कंपनीत प्रत्येकी ५० टक्यांचे भागीदार आहेत. कंपनी स्थापनेच्या वेळी कंपनीचे भागभांडवल साडेसात कोटी होते. याच कंपनीने अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे ऍग्रीकल्चर प्रोसेस उद्योगासाठी भूखंड मागणीचा अर्ज ५ एप्रिल २०२१ रोजी केला. त्यावर ९ एप्रिल रोजी मुंबईत बैठक झाली व १५ एप्रिल रोजी कंपनीला २ लाख ५२ हजार ७२६ चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड मंजूर करण्यात आला.

Actor Ritesh and Genelia Deshmukh News, Latur
Aurangabad : खासदार फौजिया खान यांच्या घरातून तीन हजार रुपयांच्या पाच भांड्यांची चोरी..

यासाठी कंपनीला ६०५ रुपये प्रति चौ. मी. प्रमाणे दर आकारण्यात आला. त्यानुसार कंपनीने एमआयडीसी कडे एकूण १५ कोटी २८ लाख ९९ हजार ३०० रुपये प्रीमियम भरला. विशेष म्हणजे कंपनी कडे केवळ साडेसात कोटींचे भागभांडवल असताना १५ कोटी पेक्षा अधिक रक्कम कंपनीने एमआयडीसीकडे कशी भरली? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

कंपनीने प्राधान्य या सदराखाली हा भूखंड मिळवल्याचे सांगितले जाते. परंतु याच प्राधान्य क्रमाच्या आधीन २०१९ एमआयडीसीकडे भूखंड मागणीचे एकूण १६ प्रस्ताव प्रलंबित होते. परंतु रितेश-जेनेलिया यांच्या कंपनीला एमआयडीसीने भूखंड मंजूर करून त्याचा ताबा देखील २२ जुलै २०२१ रोजी दिला. कंपनीने दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी पंढरपूर अर्बन को. ऑप. बँकेकडे कर्ज मागणी साठी अर्ज केला.

बॅंकेने देखील २७ ऑक्टोबर २०२१ रोजी ४ कोटी रुपयांचे कर्ज कंपनीला देऊ केले. कपनीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे देखील दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी कर्ज मागणी केली. या बॅंकेने देखील २७ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांना ६१ कोटी रुपयांचे कर्ज देऊ केले. त्यांनतर पुन्हा कंपनीने धीरज देशमुख अध्यक्ष असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २५ जुलै २०२२ रोजी ५५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले.

दोन्ही बँकेने मिळून रितेश-जेनेलियाच्या कंपनीला एकूण १२० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. १६ जणांचे भूखंड मागणीचे प्रस्ताव एमआयडीसीकडे दोन वर्षांपासून प्रलंबित असताना कंपनी स्थापन झाल्यापासून केवळ २२ दिवसांत देश ऍग्रो प्रा. ली. कंपनीला भूखंड वाटप करण्यात आल्याचा दावा देखील भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच दोन बँकांनी मिळून या कंपनीला तत्परतेने १२० कोटी रुपयांचे कर्ज कसे दिले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या ३० वर्षापासून देशमुख कुटुंबाचे वर्चस्व आहे. आजतागायत केवळ शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करणाऱ्या लातूर जिल्हा बॅंकेने रितेश व जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीसाठीच्या कर्जाला तात्काळ मंजुरी कशी दिली? या संपुर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी लातूर शहर-जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रदीप मोरे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com