Shivsena : मोठा दाढीवाला, रिक्षावाला, संज्या.. आदित्य यांच्या दौऱ्यात खैरेंची गाडी सुसाट..

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढतांना आपले महत्व कसे वाढेल? याची काळजी खैरे घेतांना दिसत आहेत. (Chandrakant Khaire)
Shivsena Leader Chandrakant Khaire News, Aurangabad
Shivsena Leader Chandrakant Khaire News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील औरंगाबाद, (Aurangabad) पैठण, वैजापूर, गंगापूर, दौऱ्यावर आहेत. शिवसेनेच्या विरोधात गद्दारी करून जे शिंदे गटासोबत गेले त्या आमदारांच्या मतदारसंघात धडक देत शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे यांच्या शिवसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात ठाकरेंसोबतच स्थानिक नेत्यांनी विशेषतः चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची गाडी चागंलीच सुसाट निघाल्याचे पहायला मिळाले. बंडखोर आमदारांचा समाचार घेतांना खैरे यांनी जी विशेषणे त्यांना लावली ती भन्नाटच होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख खैरेंनी मोठा दाढीवाला, रिक्षावाला असा करत टीका केली. तर पश्चिमचे (Sanjay Shirsat) आमदार संजय शिरसाट यांचा `संज्या` असा एकेरी उल्लेख करत ते मुंबईत पाच दिवस काय करतात हे सांगतांना हाताने पत्ते आणि दारूचा इशारा करून दाखवला. खैरे एवढ्यावरच थांबले नाही, तर २७ जुलैला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला, की गद्दारांना रस्त्यावर उतरून धडा शिकवू, मी देखील येईन, असा इशाराही दिला.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले. औरंगाबाद जिल्ह्यात या बंडाचा सर्वाधिक फटका बसला. पण शिवसेनेत वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्यांसाठी ही जणू संधीच ठरली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तेव्हापासून खैरे आता संपले अशी चर्चा राजकीय वर्तुळात अधूनमधून व्हायची.

राज्यसभेवर संधी मिळाली नाही, तेव्हा ठाकरे कुटंबाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर तर ते मातोश्रीकडून देखील दुर्लक्षित झाले होते. पण सातत्याने जिल्ह्यात, मराठवाड्यात जनसंपर्क आणि मुंबईतील नेत्यांशी संबंध ठेवत खैरेंनी शिवसेनेत पुन्हा मानाचे स्थान मिळवले. शिंदे यांच्या बंडानंतर तर खैरेंना अधिकच बळ मिळाल्याची चर्चा आहे. शिंदे यांचे बंड स्थानिक नेत्यांच्या एका अर्थाने पथ्यावरच पडले असे म्हणावे लागेल.

जिल्ह्याच्या राजकारणात खैरे विरुद्ध दानवे अशा वादाची देखील किनार आहे. पण जिल्ह्यातील बंडखोरीनंतर तुर्तास या दोघांमधील वाद थांबल्याचे चित्र आहे. एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवणारे खैरे-दानवे ठाकरेंच्या दौऱ्यात सोबत वावरतांना दिसले. आता हे चित्र किती दिवस कायम राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात खैरे यांनी काल केलेल्या आक्रमक भाषणाची चर्चा सध्या जोरात आहे.

Shivsena Leader Chandrakant Khaire News, Aurangabad
Shivsena : आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा सत्तारांच्या मतदारसंघात का नाही ?

एकनाथ शिंदे यांचा दाढीवाला असा उल्लेख करत एका रिक्षावाल्याकडे एवढे पैसे कुठून आले, त्याला पकडूनच फडणवीसांनी ठाकरे सरकार पाडल्याचा आरोप खैरेंनी केला. संजय शिरसाट यांचा तो संज्या असा उल्लेख करत हे मुंबईत पाच दिवस काय करतात? पत्ते आणि दारू असा हाताने इशार करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली. प्रदीप जैस्वाल यांना मी लक्ष्मण म्हणत होतो, पण तो कौरव निघाला. बोरनारे बायकांना मारतो, अशी टीका खैरेंनी केली.

अब्दुल सत्तार यांचाही हिरवा साप असा उल्लेख करत लवकरच त्याच्या सिल्लोडमध्येही मोठी सभा घेणार असल्याचे खैरे यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंडखोरी केल्यानंतरही आपण शांत कसे? असा सवाल उपस्थितांना करत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाल्यानंतर गद्दारांना धडा शिकवण्याचे आवाहन देखील खैरे यांनी यावेळी केले. एकंदरित एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढतांना आपले महत्व कसे वाढेल? याची काळजी खैरे घेतांना दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com