
Chhatrapati Sambhajinagar : खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वात औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून आंदोलनाला पंधरा संघटनांनी पाठिंबा दर्शवल्याचा दावा एमआयएमकडून करण्यात आला आहे. उपोषण स्थळी सर्व समाजातील असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवुन समर्थन दिल्याचे कळवण्यात आले आहे. शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या १५ सामाजिक व राजकीय संघटनानी सुद्धा या आंदोलनाला आपले जाहिर समर्थन दिले आहे.
यामध्ये औरंगाबादकर ग्रुप, लोकशाही विचार आंदोलन, गब्बर ॲक्शन कमिटी, मुस्लिम युथ फाऊंडेशन, जमीयत उलमा ए हिंद, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध समिती ( दिव्यांग सेल), औरंगाबाद जिल्हा सर्वपक्षीय दिव्यांग एकता मंच, महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान, जमियात उलमा औरंगाबाद शहर (Aurangabad) (अर्शद मदनी), सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, (Aimim) कामगार हितार्थ कंत्राटी कामगार संघटना, बज़्म- ए-ख्यावातिन फाउंडेशन, स्वतंत्र लोकसत्ता पक्ष यांच्यासह इतर संघटनांचा सहभाग आहे.
नामांतराला विरोध करणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे की, ऐतिहासिक दृष्ट्या औरंगाबाद शहर हे खूप प्रसिद्ध आहे. तसेच जगभरात शहराची ओळख सुद्धा औरंगाबाद या नावानेच आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस व महाविकास आघाडी सरकारतर्फे जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय म्हणजे मोठी चूक आहे. फक्त राजकीय स्वार्थापोटी या लोकांनी हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सबब प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ठ असताना सरकारने हा निर्णय कोणत्या नियमाने घेतला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
न्यायालयीन प्रक्रिया चालु असताना सरकारने घेतलेला निर्णय अवैध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद हे नाव कोणत्याही जाती-धर्माशी संबंधित नसून शहरातील नागरिकांची ती ओळख आहे. आमची ओळखच पुसली जात असल्यामुळे नामांतराला आमचा विरोध असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. दरम्यान, औरंगाबाद नामांतराच्या निर्णयास विरोध दर्शविण्यासाठी राज्य शासनाकडुन हरकती अथवा सुचना विभागीय आयुक्त कार्यालयात दिनांक २७ मार्चपर्यंत दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
आजपर्यंत ज्या संघटना, संस्था आणि व्यक्तीनी विभागीय आयुक्त कार्यालयात हरकती दाखल करुन पोच पावती घेतली आहे. अशा सर्वानी खासदार कार्यालय दिल्ली गेट येथे पोच पावतीची छायांकित प्रत जमा करावी. जेणेकरुन एकुण किती हरकती दाखल झालेल्या आहेत त्यांची संख्या उपलब्ध होईल, असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.