
हिंगोली : मुंबई, पुणे, ठाण्यानंतर झपाट्याने शिवसेनेचा विस्तार झालेला विभाग म्हणजे मराठवाडा. त्यात औरंगाबाद, परभणी, (Hingoli) हिंगोली सारख्या शहरात तर शिवसेनेने कमी वेळात आपले पाय घट्ट रोवले. त्यानंतर उस्मानाबाद, नांदेड या शहरांचा नंबर लागतो. बीड, लातूरमध्ये शिवसेनेला कधी मैत्री खातर तर कधी प्रभाव नसल्यामुळे मर्यादा आल्या. (Shivsena) शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंडखोरी झाली तेव्हा, मराठवाड्यातील हिंगोली, परभणीतून त्याला रसद मिळत गेली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात गद्दारांना तुडवले जायचे, पण आता काळ बदलला. (Hemant Patil) शिवसेनेने आपल्या आक्रमकपणाला मुरड घातली. परिणामी राज्यात शिवसेनेच्या म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करून पक्ष फोडण्यापर्यंत नेत्यांची मजल गेली. अर्थात जशा नाण्याला दोन बाजून असतात तशाच या बंडाला देखील आहेत.
गेल्या दोन-तीन आठवड्यात काय घडले? घडते आहे हे संपुर्ण राज्याला माहित आहे. या सगळ्या बंडखोरीच्या इतिहासात कौतुक करावे लागेल ते शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या मतदारांचे. काल दिल्लीत घडलेल्या राजकीय घडमोडीत शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार शिंदे गटाला जाऊन मिळाले. यात मराठवाड्यातील हिंगोली मतदारसंघाचे हेमंत पाटील यांचा देखील समावेश आहे.
कट्टर आणि आक्रमक शिवसैनिक अशी ओळख असलेल्या पाटील यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतील पदाधिकारी, नांदेड महापालिकेत नगरसेवक, आमदार, ते हिंगोलीचे खासदार असा आहे. म्हणजे शिवसेने त्यांना पद आणि विधानसभा, लोकसभेची संधी देतांना कुठेही हात आखडता घेतलेला नाही हे स्पष्ट होते. तरीही बंडखोरी करून पक्ष नेतृत्वाला त्यांनी आव्हान का दिले हा खरा प्रश्न आहे.
पण हिंगोली मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिला तर त्यात शिवसेनेला लागलेल्या बंडखोरीच्या ग्रहणाची नोंद पहायला मिळते. शिवसेनेच्या मतांवर निवडून आलेले खासदार बंडखोरी, गद्दारी करतात, दुसऱ्या पक्षात जातात, पण एवढे होऊनही शिवसेनेचा मतदार मात्र कायम पक्षाच्या पाठीशीपणे ठामपणे उभा राहिल्याचे गेल्या २५-३० वर्षात दिसून आले आहे. निवडून दिलेल्या खासदारांनी चूक केली तरी त्याची शिक्षा हिंगोलीच्या हिंदुत्ववादी मतदारांनी कधी पक्षाला दिली नाही.
प्रत्येक निवडणुकीत पक्ष देईल त्या उमेदवाराला इमाने-इतबारे विजयी करण्याचे काम येथील जनतेने केले आहे. गेल्या वीस वर्षात शिवसेनेत झालेली ही चौथी बंडखोरी म्हणावी लागेल. यापुर्वी विलास गुंडेवार, अॅड.शिवाजी माने, सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळवत लोकसभा गाठली. पण पुढे ते पक्षासोबत कायम राहिले नाहीत. पक्षावर नाराजी व्यक्त करत त्यांनी दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरला.
आता हेंमत पाटील यांनी शिवसेनेच्याच बंडखोर गटात सहभागी होऊन हिंगोलीच्या बंडखोरीच्या इतिहासात नवा अध्याय जोडला आहे. या बंडाचे काय होणार हे आता सर्वोच न्यायालयाच्या १ आॅगस्टच्या सुनावणीत स्पष्ट होईल. त्यामुळे आता यापुढे हिंगोलीचा मतदार शिवसेनेच्या पाठीशी कायम राहतो, की मग बंडखोरीला नवा पर्याय शोधतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.