नववर्षाच्या शुभेच्छा अन् तिळगुळाने खैरे-दानवे यांच्यात गोडवा निर्माण होणार ?

दानवे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत खैरेंना पेढा भरवला. या पेढ्यातील गोडवा संपत नाही तोच पुन्हा मकरसंक्रांतीचा मुहुर्त साधत तिळगुळ देत एकमेकांशी कायम गोड बोलण्याच्या आणाभाकाही घेतल्या.(Shivsena Aurangabad)
Ambadas Danve-Chandrakant Khaire
Ambadas Danve-Chandrakant KhaireSarkarnama

औरंगाबाद : एकाने शिवसेनेची मुहुर्तमेढ रोवली, तर दुसऱ्याने त्यावर कळस चढवला असे वर्णन करावे असे शिवसेनेतील दोन नेते म्हणजे चंद्रकांत खैरे (Chadrakant Khaire) व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे. (Aurangabad) खैरे कट्टर, बाळासाहेबांचे निष्ठावान सैनिक तर दानवे भाजपमधून आले आणि आपल्या संघटन कौशल्याने जिल्ह्यातील शिवसेनेचे (Shivsena) महत्वाचे भाग बनले.

संदीपान भुमरे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांचे पक्ष वाढीतील योगदान देखील मोठे पण त्यांनी कधी याचा गवगवा केला नाही. त्यामुळे आपला मतदारसंघ भला म्हणत यांनी आपले राजकारण मर्यादित ठेवले. चंद्रकांत खैरे दोनवेळा आमदार, राज्यात मंत्री, चारवेळा सलग खासदार आणि मातोश्रीवर वजन असलेले नेते.

औरंगाबाद जिल्हाच नाहीतर मराठवाड्यातील कोणाताही नवा पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी खैरेंना डावलून मातोश्रीवर पोहचू शकत नसे, इतका त्यांच्या पक्षात दबदबा. तर दुसरीकडे बाळासाहेबांनंतर पक्षाची धुरा सांभाळणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत काम आणि संघटनेला खरे उतरणारे शिवसेनेतील शोमन म्हणजे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे. त्यामुळे खैरे-दानवे यांच्या भोवती जिल्ह्यातील शिवसेनेचे राजकारण नेहमीच फिरत राहिले.

आताच्या काळात पक्षात दाखल झालेले अब्दुल सत्तार यांनी पक्षात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी आपल्या फटकाळ आणि नको तिथे वादग्रस्त विधान करण्याच्या सवयीमुळे ते अजून तरी पक्षाशी एकरुप झालेले नाहीत हे त्यांच्या अलीकडच्या कृतीवरून दिसून आले आहेत. पण एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही ही जी म्हण आहे ती जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्वाला तंतोतंत लागू पडते.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खैरे संपले असे चित्र निर्माण करून विरोधी गटाने काही काळ त्यांना जिल्ह्यातील महत्वाच्या निर्णयापासून देखील दूर ठेवले. यासाठी नुकचे पक्षात झालेले सत्तार यांचा खांदा वापरला किंवा त्यांनी आपली ताकद वाढवण्यासाठी तो वापरु दिली. गेल्या पाच-सात वर्षात जिल्ह्यात खैरे विरुद्ध दानवे असा संघर्ष एकदा नाहीतर अनेकदा पहायला मिळाला.

दिल्लीत खासदार असेपर्यंत खैरे यांचे पारडे जड होते, पण २०१९ च्या पराभवानंतर त्यांच्या पारड्यातले वजन हळूहळू घटू लागले. तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ते विधान परिषदेचे आमदार अशी अंबादास दानवे यांचा आलेख वाढत गेला. राज्यात सत्तांतर झाले, महाविकास आघाडीची सत्ता येऊन उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि अनेकांचे नशीब फळपळले. संदीपान भुमरे कॅबिनेट मंत्री, बाहेरून निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेले सत्तार यांना राज्यमंत्री पद मिळाले.

आमदार झालेल्या दानवेंचाही मातोश्रीवरील संपर्क आणि वावर वाढला. पालकमंत्री सुभाष देसाई खैरेंना टाळत दानवेंना जवळ करू लागले. खैरे समर्थकांसाठी हे चित्र फारसे सुखावणारे नव्हते. पण अशा संकटातही हे समर्थक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे काही पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी दोन्ही डगरीवर पाय ठेवत खैरे-दानवेंना खूष ठेवण्याची कसरत केली आणि करतायेत.

खैरे-दानवे यांच्यातील वादाची मालिका खूप मोठी आहे, त्यात मुंबईने नेमलेल्या पालकमंत्र्यांचा देखील मोठा हात वेळोवेळी राहिलेला होता. पण आता शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांची एक फळीच झाकोळली गेली आहे. त्या तुलनेत चंद्रकांत खैरे मात्र अंतर्गत गटबाजी आणि कुरघोड्यांचे प्रयत्न होऊन देखील आपले स्थान टिकवून आहेत. उद्धव ठाकरे यांना खैरेंची पक्षनिष्ठा भावल्यामुळेच ते त्यांना अजूनही अंतर द्यायला तयार नाहीत.

Ambadas Danve-Chandrakant Khaire
फडणवीसांनी हात झटकले; उत्पल पर्रीकरांची जबाबदारी आता शिवसेनाच्या खांद्यावर

अगदी राज्यसभेवर संधी नाकारल्यानंतर जाहीरपणे टिका केली तरी ठाकरेंनी ती फारशी मनावर घेतली नाही. इकडे प्रसार माध्यमांमध्ये वेळोवेळी खैरे-दानवे यांच्यातील वादाचे किस्से आणि प्रसंग रंगवले गेले. खैरेंनी थेट दानवेंचे नाव घेऊन टीका केली, पण दानवेंनी मात्र जाहीर किंवा माध्यामांशी बोलतांना खैरे माझे नेते आहेत, घरात भांड्याला भांडे लागतच असते, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, असे म्हणत वेळ मारून नेली.

पण वरिष्ठांपर्यंत जे पोहचवायचे त्यात मात्र कधी हातचे राखले नाही हे देखील तेवढेच खरे. त्यामुळे आंदोलन, मेळावे, सभा, नेत्यांच्या पुण्यतिथी, जंयतीचे कार्यक्रम असले की या दोन नेत्यांची तोंड कायम विरुद्ध असल्याचे दिसून आले. हा सगळा मागोवा घेण्याचे कारण म्हणजे नवीन वर्षात या दोन नेत्यांच्या बाबतीत आश्चर्यकारक घटना घडल्या आहेत.

पहिली म्हणजे अंबादास दानवे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत खैरेंना पेढा भरवला. या पेढ्यातील गोडवा संपत नाही तोच पुन्हा मकरसंक्रांतीचा मुहुर्त साधत तिळगुळ देत एकमेकांशी कायम गोड बोलण्याच्या आणाभाकाही घेतल्या. आता या शुभेच्छा, तिळगुळ भविष्यात येणारी एखादी राजकीय संक्रात टाळण्यासाठी होता, की मग मनापासून झालं गेलं ते विसरून आगामी निवडणुकीत शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी पुढे टाकलेले पाऊल होते हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com