
औरंगाबाद : उद्धव साहेब कृपया आम्हाला गद्दार म्हणून नका, आम्ही शिवसेनाप्रमुखांचे पाईक आहोत. आम्ही शिवसेना (Shivsena) सोडलेली नाही. अन्यायाविरुद्ध पेटून उठा ही शिवसेनाप्रमुखांचीच शिकवण होती, आम्ही तेच करत आहोत. आम्हाला आशिर्वाद द्या, आमच्या पाठीशी उभे राहा, मग बघा आम्ही काय करतो ? अशा शब्दांत आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला.
सकाळी ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय शिरसाट यांनी गुवाहटीतून एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. (Aurangabd) या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही भेटत नव्हतात, निधी मिळत नव्हता या तक्रारीचा पाढा वाचतांनाच आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणू नका, असे आवाहन केले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात आमदार शिरसाट हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे दिसत आहे.
शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच शिरसाट यांना आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यावधीचा निधी मिळाला होता. त्यामुळे शिरसाट यांच्या शिंदेसोबत जाण्याचा धक्का फारसा कुणाला बसला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी फेसबुकच्या माध्यमातून शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांना उद्देशून एक सविस्तर निवेदन केले होते. त्याला उत्तर म्हणून शिरसाट यांनी सकाळी एक पत्र लिहले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांनी एक व्हिडिओ जारी केला.
या व्हिडिओमध्ये शिरसाट यांनी पुन्हा अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहेत. शिरसाट म्हणाले, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, गद्दारी केलेली नाही, त्यामुळे आम्हाला बंडखोर म्हणू नका. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस सोबत जाणे म्हणजे आपले घर जाळण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत आम्हाला या पक्षांचा काय त्रास झाला हे आम्ही वारंवार तुम्हाला सांगत होतो. मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी द्या, अशी मागणी करणारी पन्नास पत्र आम्ही आपल्याला पाठवली होती. तेव्हा तुम्ही आम्हाला बदल्या आणि निधीची कामे माझ्याकडे घेऊन येऊ नका, असे म्हणायचातं.
मग निधी कुणाला मागायचा हा प्रश्न आहे. तुम्ही आम्हाला संस्था काढण्याचा सल्ला देखील वेळोवेळी द्यायचचातं. पण संस्था काढायला कुणाकडे पैसा आहे, निवडणुका लढवल्या तेव्हा सुद्धा कुणाकडे पैसे होते ? पण बाळासाहेबांच्या आशिर्वादाने आम्ही निवडून आलो. काल तुम्ही वर्षा बंगल्यावरून गेला, तेव्हा तुमच्यावर फुले उधळण्यात आली.
मुळात मुख्यमंत्री म्हणून तुम्ही वर्षा निवासस्थान सोडून जाणे आम्हाला आवडले नाही. कालचा प्रसंग हा एखाद्याला निरोप द्यावा, असा होता. वर्षावर तुमचे स्वागत होणे हे आम्हाला आवडले असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आणि त्यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या मुद्यावरच आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहोत. आम्हाला बंडखोर म्हणू नका, उलट आम्हाला आशिर्वाद द्या, पाठीशी उभे राहा, मग बघा आम्ही काय करतो? असे देखील शिरसाट या व्हिडिओमध्ये म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.