Cm Eknath Shinde Speech News in Sillod , Aurangabad
Cm Eknath Shinde Speech News in Sillod , AurangabadSarkarnama

Eknath Shinde : आम्ही पाऊल उचललं नसतं तर शिवसेना संपली असती..

राज्याच्या विकासाची काम करणे, शेतकरी, मजुर, कष्टकरी, विद्यार्थी अशा सगळ्या समाजघटकांसाठी काम करणे हाच आमचा अजेंडा आहे. आमचा दुसरा कुठलाही वैयक्तिक अजेंडा नाही. (Eknath Shinde)

औरंगाबाद : राज्यातील जनतेने हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना-भाजप युतीला बहुमतासह सत्ता दिली होती. त्यांचे १०६ आमचे ५६ आमदार निवडून आले होते. पण न दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शब्दावर ते अडून बसले आणि ज्या राष्ट्रवादी-काॅंग्रेसला बाळासाहेब आपला नंबर एकचा शत्रू मानायचे त्या दोन पक्षांसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. पुढे व्हायचे तेच झाले, आमच्या आमदारांना निधी नाही, (Shivsena) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे, तडीपाऱ्या, मोक्काच्या केसेस टाकल्या. सगळे मला येऊन सांगत होते, मी त्यांना समजावून सांगायचो, नेत्यांशी बोलून पाहिले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं.

बाळासाहेबांचा आणि हिंदत्वाचा विचार, आनंद दिघे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आम्ही पाऊल उचललं. ते जर उचललं नसतं तर आज शिवसेना वाचली नसती, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचे समर्थन केले. (Abdul Sattar) आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील नागरी सत्कार आणि विविध विकासकामांचे भुमीपूजन, लोकार्पण आणि उद्धाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज सिल्लोडमध्ये होते.

औरंगाबाद ते सिल्लोड या मार्गावर त्यांचा ९ ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना शिंदे यांनी या संपुर्ण घटनाक्रमाचा उहापोह केला. शिंदे म्हणाले, ५० आमदार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, कोणीही विचारले नाही, पुढे काय होणार, कसे होणार. आमच्यासाठी हा प्रसंग बाका होता, लढाई कठीण होती, पण सत्तार यांच्यासह सर्व आमदारांचा विश्वास आणि जनतेच्या पाठबळावर आम्ही ही लढाई जिंकू शकलो.

सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई आणि या दरम्यान भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी जी माझी चर्चा झाली, त्यातून अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा कुठलाच शब्द उद्धव ठाकरे यांना देण्यात आला नव्हता हे मला सांगितले गेले. आम्ही शब्द दिला तर तो पाळतो हे सांगतांना बिहारमध्ये कमी संख्याबळ असतांना नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केल्याचा दाखला मला दिला गेला. आताही माझ्यासोबत ५० आमदार असतांना मला मुख्यमंत्री केलं.

राष्ट्रवादी-काॅंग्रेससोबत सत्ता स्थापन करणं कुणालाही आवडलं नाही. आमदारांमध्ये नाराजी होती, मी स्वतः शिवसेनेच्या नेतृत्वाशी बोलून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा विषय असेल तर फडणवीसांशी बोलून मार्ग काढू असे सांगितले. पण आधीची अडीच वर्ष आपल्या मिळाली पाहिजे, नंतर भाजपने शब्द फिरवला तर काय ? असा प्रश्न उपस्थित केला गेला. मुळात भाजपसोबत सरकार स्थापन करायचे नाही हे आधीच ठरले होते, असा दावा देखील शिंदे यांनी केला.

Cm Eknath Shinde Speech News in Sillod , Aurangabad
राऊतांची बेहिशोबी संपत्ती आमच्या नावावर : प्रविण राऊत आणि स्वप्ना पाटकरांचा खळबळजनक दावा

बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा आपल्या भाषणातून राष्ट्रवादी-काॅंग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर मी दुकान बंद करून टाकीन, असे स्पष्टपणे सांगितले होते. तरीही बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला बाजूला सारून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं गेलं. स्वातंत्रवीर सावरकरांबद्दलचे विचार आम्ही व्यक्त करू शकत नव्हतो, कारण सरकारमध्ये काॅंग्रेस होती. अडीच वर्ष प्रत्येक मंत्री, आमदाराची सरकारमध्ये घुसमट होत होती.

राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या मतदारसंघात ५०-१०० कोटींचा निधी दिला जायचा, आणि आम्हाला ५-१० कोटी. यातून निर्माण झालेल्या अस्वस्थतेतून आम्ही उठाव केला. हे सरकार सामान्याचं आहे, एक शिवसैनिक आज मुख्यमंत्री झाला आहे, त्यामुळे जनतेच्या हिताची, राज्याच्या विकासाची काम करणे, राज्यातील शेतकरी, मजुर, कष्टकरी, विद्यार्थी अशा सगळ्या समाजघटकांसाठी काम करणे हाच आमचा अजेंडा आहे. आमचा दुसरा कुठलाही वैयक्तिक अजेंडा नाही, असेही शिंदे यांनी स्पष्टे केले.

अब्दुल सत्तार यांनी माझ्याकडून सर्वाधिक निधी मिळवला, पण हरकत नाही ते जनतेच्या हिताची कामे करत आहेत. त्यामुळे आणखी निधी देईन, असे आश्वासन देखील शिंदे यांनी यावेळी दिले. आम्हाला गद्दार, बंडखोर म्हटलं गेलं, पण माझ्या नाशिक, मालेगांव, वैजापूर, औरंगाबाद आणि सिल्लोड दौऱ्यात जो प्रतिसाद आणि लोकांचे प्रेम मिळाले ते पाहता आम्ही घेतलेला निर्णय किती योग्य होता हे स्पष्ट झाले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्वागतासाठी जशी गर्दी जमायची तेच भाग्य आज मलाही लाभले, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो, असेही शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com