
औरंगाबाद : वेदांता प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारकडून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर (Uddhav Thackeray) फोडले जात आहे. (Maharashtra) तर महाराष्ट्रात येऊ घातलेला पावणे दोन लाख कोटी गुंतवणुकीचा वेदांता प्रकल्प राज्यातील सत्तांतरानंतर दोन महिन्यातच गुजरातला कसा गेला ? असा सवाल करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे.
आता या वादात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उडी घेतली असून आघाडी सरकारच्या नेते आणि तत्कालीन मंत्र्यांच्या टक्केवारीमुळे वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भातील काही पुरावे आपल्या हाती लागले असून लवकरच आपण ते माध्यमांसमोर आणणार आहोत, असा दावा देखील शिरसाट यांनी केला.
मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यामागे महाविकास आघाडी सरकारची टक्केवारी आणि नफेखोरी कारणीभूत असल्याचा आरोप केला. शिरसाट म्हणाले, वेदांता प्रकल्प हा काही आत्ताच राज्यात आलेला नव्हता, त्याची प्रक्रिया वर्षभरापासून म्हणजेच आघाडी सरकारच्या काळापासून सुरू होती. कुठल्याही उद्योजकाला आपला उद्योग लवकर सुरू व्हावा, त्यातून नफा मिळावा असे वाटत असते.
परंतु आघाडी सरकारमधील तत्कालीन मंत्री आणि नेत्यांमध्ये टक्केवारी संदर्भात एक मत न झाल्यामुळे वेदांतासोबतची डील फिस्कटली. शिंदे सरकार येऊन दोन महिने झाले आहेत, त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला जाण्याचा दोष या सरकारच्या माथी मारणे चुकीचे आहे. महाविकास आघाडी सरकार आणि वेदांता कंपनीमधील डील होऊ न शकल्यामुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला आहे.
तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेच या प्रकल्पासाठी बोलणी करत होते. या संदर्भातील काही पुरावे आमच्या हाती लागले असून लवकर ते माध्यमांसमोर देऊ, असा दावा देखील शिरसाट यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.