
औरंगाबाद : येथील बहुचर्चित आणि प्रलंबित पाणीप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आज मराठवाडा विभाग आढावा बैठकीनंतर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, औरंगाबादमध्ये (Aurangabad) पाण्याचा प्रश्न आहे. यात ७०० मीमी जलवाहिनी बदलण्याची मागणी होती. पाईप बदलले तर त्यासाठी २०० कोटी लागतील. मात्र यामुळे १७ ते १८ लाख लोकांना फायदा होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे शासनाने या निधीला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे जवळपास ७० एमएलडी पाणी उपलब्ध होईल. आता सात दिवसाने पाणी मिळते, ते नंतर एक दिवस आड मिळेल, असा आशावाद मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलून दाखविला.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, आजच्या बैठकीमध्ये मराठवाड्यातील पंचनामे, नुकसान, झालेले मृत्यू या सर्वांचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत, पण ही मदत कमी असल्याने राज्य सरकार आपल्या परिने पूर्ण मदत करणार आहे. शिवाय वेरूळ-घृष्णेश्वर, ओंढा-नागनाथ या मंदिरांच्या विकासाची मागणी करण्यात आली होती, ती देखील पूर्ण केली जाणार आहे. नांदेड शहराच्या रस्त्याचे प्रस्ताव आला. नांदेडातील भूमिगत गटार योजना मंजूर करू. नांदेड-जालना एक समृद्धी हायवे करणार आहोत. परभणीतील समांतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी मोफत जमीन देण्याच्या अडचणी दूर करू.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी औरंगाबादमधील घाटी रुग्णालयाचे खासगीकरण करणार नसल्याचा सकारात्मक निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. संभाजीनगर क्रिडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक - उद्यान, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्मारक बांधकामाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील वाहुन जाणारे पाणी मराठवाड्याला वळविण्याचा निर्णय घेतला आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
मराठवाड्यातील आत्महत्या कमी करण्यासाठी निर्णय घेतला आहे. आत्महत्या होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह अॅक्शन घेतली पाहिजे. यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना प्लॅन तयार करायला सांगितलं आहे. बँकांनाही शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि बँकाचे अधिकारी यांच्या बैठका घेणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.