
Shivsena : संजय राऊत हे एका बंद केबीनमध्ये बसून आमच्या इतक्या जागा, तितक्या जागा हे सांगू शकतात. पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे? हे त्यांना माहितच नाही. (Sanjay Shirsat On Raut News) गेल्यावेळी शिवसेनेचे जे १९ खासदार निवडून आले होते, ते शिवसेना-भाजप युतीमुळे आले होते. युती म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिले होते. त्यामुळे आता पुन्हा आमच्या १९ जागा असा संजय राऊत यांचा दावा हास्यास्पद आहे, अशी टीका शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केली.
महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून सुरू असलेली चर्चा आणि त्यात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी १९ जांगावर केलेला दावा, यावर शिरसाट यांनी भाष्य केले. मुंबईत माध्यमांशी बोलतांना शिरसाट यांनी १९ पैकी आता तुमच्याकडे किता खासदार उरलेत? असा टोला देखील लगावला. कर्नाटक राज्यातील भाजपच्या पराभवानंतर राज्यातील महाविकास आघाडी अधिक सक्रीय झाली आहे.
आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठका होत असल्याचेही सांगितले जाते. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आमचे १९ खासदार निवडून आले होते, त्यामुळे आम्ही त्या जागा तर लढवणारच, अशी भूमिका घेतली होता. यावर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राऊतांवर टीका केली.
शिरसाट म्हणाले, १९ पैकी आता तुमच्याकडे तीन-चार खासदार राहिलले आहेत, त्यापैकी काही राज्यसभेचे आहेत. त्यामुळे तुम्ही लोकसभेच्या १९ आणि आणखी नव्या जागांवर दावा सांगितला, तर मग राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने काय करायचे? त्यांनी गोट्या खेळायच्या का? राऊत यांना प्रत्यक्ष राज्यातील राजकारणातली परिस्थिती काय आहे हेच माहीत नाही. जे १९ खासदार आणि जांगावर ते दावा सांगतायेत मुळात ते खासदार शिवसेना-भाजप युती म्हणून निवडून आले होते. त्यापैकी ठाकरे गटाकडे आता फक्त तीन ते चार शिल्लक आहेत. त्यामुळे राऊतांनी केबीनमध्ये बसून मत मांडू नये.
राहिला प्रश्न कर्नाटक राज्यातील भाजपने केलेल्या २०० जागा जिंकण्याच्या दाव्याचा, तर त्याचा संबंध महाराष्ट्राशी लावता येणार नाही. तिथली राजकीय परिस्थिती आणि महाराष्ट्रातली वेगळी आहे. तुम्ही सुद्धा बिहार, उत्तर प्रदेशात निवडणुका लढल्या होत्या, तिथे नोटा पेक्षा देखील कमी मते तुम्हाल मिळाली होती. त्यामुळे इतर राज्यातील निकालाची तुलना महाराष्ट्रातील राजकारणाशी करणे योग्य नाही. आतापर्यंत लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी मातोश्रीवर बैठका व्हायच्या, पण आता यांना दारोदार फिरावे लागते इतकी वाईट अवस्था तुमची झाली आहे, असेही शिरसाट ठाकरे गटाला उद्देशून म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.