मुख्यमंत्र्यांचे स्वागत आणि शक्तीप्रदर्शन सत्तारांना मंत्रीपद मिळवून देणार ?

शिंदेनी देखील जिल्ह्यातील इतर आमदारांपेक्षा सत्तारांनाच झुकते माप दिल्याचे दिसून येते. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत, शक्तीप्रदर्शन सत्तारांना मंत्रीपद मिळवून देणार का? (Abdul Sattar)
Mla Abdul Sattar News Aurangabd
Mla Abdul Sattar News AurangabdSarkarnama

औरंगाबाद : जिथे सत्ता तिथे मी, कारण माझ्या नावातच सत्ता आहे, असा छातीठोकपणे दावा करणारे माजीमंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सध्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सत्तारांच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात सर्वाधिक वेळ घालवणार आहेत. विविध विकासकामांची उद्धाटने, भूमीपुजन, सभा आणि पत्रकार परिषद असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे.

एवढेच नाही तर शहरातील हर्सुल पासून ते सिल्लोड शहरापर्यंतच्या ५५ किलोमीटर अंतरात शिंदे यांचे ठिकठिकाणी स्वागत देखील करण्यात येणार आहे. (Aurangabad) एवढा आटापिटा कशासाठी तर शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन मिळावे यासाठी. अब्दुल सत्तार यांचे राजकारण हे नेहमीच महत्वाकांक्षी राहिलेले आहे. मनाविरुद्ध घडले की बंडाचे निशाण फडकवायचे ही त्यांची पद्धत. त्यांच्यासाठी पक्षनिष्ठा, धोरण, नेता है गौणच ठरते.

ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी सत्तारांनी कित्येक मैल पायघड्या अंथरल्या आहेत, त्याच मार्गावरून काही महिन्यांपुर्वी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासाठी देखील सत्तारांनी अशीच व्यवस्था उभी केली होती. ऐन निवडणुकीच्या तोडांवर शिवसेनेत दाखल झालेल्या सत्तारांना तीन पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये देखील महसुल व ग्रामविकास सारख्या महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले होते.

पण कॅबिनेटवर डोळा असलेल्या सत्तारांनी संधी मिळताच ठाकरेंनाही हात दाखवला आणि शिंदेच्या बंडाचे म्होरके झाले. गर्दी जमवण्याची कला आणि नेत्यावर प्रभाव पाडण्याची कार्यपद्धती सत्तारांना आतापर्यंत यश देत गेली. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत आपल्याला हवा तो उमेदवार दिला नाही, म्हणून सत्तारांनी काॅंग्रेसची साथ सोडली, त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार होते.

फडणवीस यांची जनआशिर्वाद यात्रा जेव्हा औरंगाबादहून सिल्लोडला निघाली तेव्हा देखील सत्तारांनी या यात्रचे फुलंब्रीपासून स्वागत करत मतदारसंघात मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. भाजपमध्ये प्रवेश निश्चित समजून त्यांच्या संपर्क कार्यालयाचा रंग, ध्वज आणि बॅनर देखील बदलण्यात आले होते.

Mla Abdul Sattar News Aurangabd
Shivsena : शस्त्र उचलायला सांगणाऱ्या अर्जूनानेच शस्त्र ठेवले..

पण भाजपमध्ये जाण्याचा बेत फिस्कटला आणि त्याच कार्यालयावर भगवा, बाळासाहेब ठाकरे, उद्धव, आदित्य ठाकरेंचे फोटो झळकले. हा झटपट बदल घडवणे ही सत्तारांची खासियत राहिली आहे. आता राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांचा पहिला मोठा कार्यक्रम आपल्या मतदारसंघात घेणार हे जाहीर केल्यानंतर सत्तारांनी तसेच करून दाखवले आहे. शिंदेनी देखील जिल्ह्यातील इतर आमदारांपेक्षा सत्तारांनाच झुकते माप दिल्याचे दिसून येते. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत, शक्तीप्रदर्शन सत्तारांना मंत्रीपद मिळवून देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in