Thackeray : मुख्यमंत्री संतापले, मला कारणे सांगू नका, नागरिकांना पाणी वाढवून कसे देता येईल ते सांगा..

नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. ( Uddhav Thackeray)
Thackeray : मुख्यमंत्री संतापले, मला कारणे सांगू नका, नागरिकांना पाणी वाढवून कसे देता येईल ते सांगा..
Chief Minister Uddhav ThackeraySarkarnama

औरंगाबाद : शहरातील नागरिकांना आठदिवसाआड पाणी मिळते. हाच प्रश्न घेऊन २३ मे रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहरातून जल आक्रोश मोर्चा काढला होता. विरोधकांकडून पाणी प्रश्नाला शिवसेनाच जबाबदार असल्याचे चित्र त्यामुळे निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खास औरंगाबादच्या पाणी प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी संबंधित खात्यांचे मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक वर्षा बंगल्यावर बोलावली होती.

औरंगाबादच्या (Aurangabad) पाणी प्रश्नाबाबत गंभीर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सध्या सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या गतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. मला कारणे सांगत बसू नका, नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार आहे. (Municipal Corporation) त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पहावे, अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेतील पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. यावरून राजकारण देखील सुरू असून आगामी महापालिका निवडणुका पाहता विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. भाजपने जल आक्रोश मोर्चा काढत पाणी प्रश्नाला एकटी शिवसेनाच कशी जबाबदार आहे, हे पद्धतशीपणे बिंबवण्याचा प्रयत्न केला. यावर शिवसेनेने ५० टक्के पाणीपट्टी कपातीचा निर्णय घेत पाणी प्रश्नावरून जनतेच्या मनात असणार रोष कमी करण्याचा प्रयत्न केला.

८ जून रोजी उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे. तत्पुर्वीच आज मुख्यमंत्र्यांनी वर्षा या आपल्या निवासस्थानी औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री चांगलेच संतपाले होते, मला कारणे सांगू नका, नागरिकांना पाणी कसे वाढवून देता येईल ते सांगा, अशा शब्दात त्यांनी विभागीय आयुक्तांना या संपुर्ण प्रकरणावर लक्षर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या १६८० कोटी रुपयांची ही योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा कालबध्द रीतीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा. या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नाही, यातील उणिवा प्राधान्याने दूर करून शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल. या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
Congress : एक कुटुंब एक पद, परभणीच्या पदाधिकाऱ्याचा प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणे हे प्राधान्याचे काम असून शहर पाणीपुरवठा योजनेचे काम निधीअभावी रेंगाळणार नाही, याची दक्षता शासनाने घेतली आहे. शहराच्या फारोळ्यापर्यंत पाणी आणणे, ते साठविण्यासाठी टाक्या बांधणे ही कामे तातडीने करावी लागणार असून या योजनेचा काही भाग हा जायकवाडी प्रकल्पात असल्याने त्यासाठी केंद्रीय वन विभागाची परवानगी आवश्यक आहे, ही परवानगी मिळविण्यासाठी वन विभागाने तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

शहरात पाणीपुरवठ्याची नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार असून कोणत्याही परिस्थितीत शहरात पाण्याअभावी परिस्थिती बिकट होणार नाही यासाठी गतीने कार्यवाही करून विभागीय आयुक्तांनी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. वेळेत काम पूर्ण करुन घेण्यासाठी संबंधित कंत्राटदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबरोबरच कालबद्धरित्या काम पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक तयार करा आणि मुख्यमंत्री संकल्प कक्षातून योजनेच्या कामाचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

बैठकीला उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा हे उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय आदी सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in