मंत्रीमंडळ विस्तार २६-२७ तारखेलाच; पहिल्या टप्यात दहाच्या आत

Shinde-Fadanvis Government| पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात मंत्र्यांची संख्या १० च्या घरात असेल.
 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Eknath Shinde| Devendra FadanvisSarkarnama

दत्ता देशमुख

बीड : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असे दोघांचे मंत्रीमंडळ असल्याची टिका आणि आता तर ‘राजेशाही काळात एकटाच राजा राज्य हकत होता’ त्यामुळे मंत्रीमंडळाची गरजच काय, अशी टिका सुरु झाली आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत वेगवेगळ्या तारखाही समोर येत आहेत. मात्र, मंत्रीमंडळाचा विस्तार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शपथविधीनंतर होणार असल्याची ‘सरकारनामा’च्या खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे. (Shinde-Fadanvis Government)

पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात मंत्र्यांची संख्या १० च्या घरात असेल. यात भाजपचे पाच किंवा सहा तर शिंदे गटाचे चार किंवा पाच मंत्री असतील असेही सांगीतले जात आहे. जुन महिन्याच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि काही दिवसांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदाचा मुकूट चढला तर सरकारबाहेर राहण्याची घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिंदेंचे बंड, त्यांना मिळालेले मुख्यंत्रीपद आणि फडणवीसांचे उपमुख्यमंत्रीपद या तिनही राजकीय घटना चक्रावणाऱ्या ठरल्या. शिवसेनेतील धुसफूस तशी जुनीच होती. मात्र, बंडात सहभागी आमदारांची संख्या मात्र राजकीय जाणकारांच्या अंदाजाच्या अनेक पटीने अधिक होती.

 Eknath Shinde| Devendra Fadanvis
सत्ता जाताच जयंत पाटलांच्या विरोधात कोर्टाचे वारंट

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ३० जुनला शपथ घेतली. तेव्हापासून मंत्रीमंडळाच्या विस्ताराची तारीख आणि संभाव्य मंत्रीमंडळातील नावांची चर्चा सुरु आहे. सुरुवातीला आषाढी वारीनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, असा अंदाज बांधला जात होता. तर, राष्ट्रपती निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल असे वाटत होते. याच दरम्यान, शिवसेना आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळेही मंत्रीमंडळाचा विस्तार लांबल्याचे बोलले गेले. आता यासह इतर मुद्द्यांवरील सुनावणी एक ऑगस्टला होणार आहे. याच काळात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळाने घेतलेल्या विविध निर्णयांवरही टिका होत आहे. एखादा निर्णय घेण्यासाठी कायदेशिर किमान १२ मंत्र्यांची गरज असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

मंत्रीमंडळाचा विस्तार रखडल्याने सरकारने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. मात्र, आता एक ऑगस्टपासून अधिवेशनही होणार असल्याने मधल्या काळात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे निश्चित झाले आहे. रविवारी (ता. २४) भाजप अध्यक्ष जे. पी. नड्‌डांनी भाजप प्रणित राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे. याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. २५) नुतन राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा शपथविधी आहे. या शपथविधीसाठीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतच असतील. याच दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमत्री संभाव्य मंत्र्यांच्या यादीला श्रेष्ठींकडून मान्यता मिळवतील वा निश्चित केलेली यादी त्यांच्या कानी घालतील, अशी माहिती आहे.

याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी (२६ किंवा २७ ऑगस्ट) मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकतो. दरम्यान, पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात मंत्र्यांची संख्या १० च्या आसपासच असेल. यात भाजपचा आकडा एखादा - दोनने अधिक असू शकतो. येवढ्या मंत्र्यांवरच पहिले अधिवेशन पार पाडण्याची नव्या सरकारची स्ट्रॅटेजी आहे. इच्छुकांना पुढचे आश्वासने आणि नंतरच्या काळात सर्वोच्च न्यायालयातील विविध प्रकरणांचे निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. नंतर नागपूर अधिवेशनापूर्वी महामंडळे, उर्वरित मंत्रीपदाच्या माध्यमातून इच्छुकांची वर्णी लावली जाणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in