तिघाडी सरकार पडणार; पण मुहूर्त नाय सांगणार!
Chandrakant Patil sarkarnama

तिघाडी सरकार पडणार; पण मुहूर्त नाय सांगणार!

पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला विजयी करा, काल चक्राप्रमाणे सत्तेत बदल झाल्याचे तुम्हाला दिसेल.

देगलूर (जि. नांदेड) : तिघे नाही तर पाच जणही एकत्र येऊन आमच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुरून उरु, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला. हे तिघाडीचे सरकार लवकरच कोसळेल पण...मुहूर्त सांगणार नाही. त्यांच्या कर्माने ते लवकरच पडणार असल्याचे भाकित पाटील यांनी केले. देगलूर पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष पिराजी साबणे (Subhash Sabne) यांना भाजपची (BJP) उमेदवारी दिल्याची घोषणा त्यांनी केली. (BJP state president Chandrakant Patil criticizes the state government)

Chandrakant Patil
देगलूरमध्ये फडणवीसांनी 'चावी' तर फिरवलीय...'पंढरपूर इफेक्ट' दिसणार का?

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी समर्थकांसह सोमवारी (ता.४) पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी चंद्रकांत पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती. यावेळी सुनील कर्जतकर, भाऊसाहेब देशमुख, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, गणेश हाके, प्रवीण साले, माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, गंगाधरराव जोशी, राजेश महाराज देगलूरकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, डॉ. संतुक हंबर्डे, डॉ. अजित गोपछडे, देवीदास राठोड आदींची उपस्थिती होती.

सुभाष साबणे यांचा भाजपमध्ये रितसर प्रवेश झाल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले. पाटील म्हणाले की, सरकार तुमचे, तुम्ही सरकारचे प्रमुख असूनही राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात तुमच्या कार्यकर्त्यांची कोंडी होत असेल अन तुम्ही गप्प राहणार असाल तर हळूहळू एक एक कार्यकर्ता दूर होणार नाही तर कसा...? सत्तेसाठी लाचारी तरी किती पत्करायची? हे ठरवण्याची वेळ आली असल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

Chandrakant Patil
पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक गाजतेय खासदार पुत्रामुळे

पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला विजयी करा, काल चक्राप्रमाणे सत्तेत बदल झाल्याचे तुम्हाला दिसेल, असे सांगून नुकसान भरपाई देण्यासाठी आचारसंहितेची अट किंवा आडकाठी ठरणार नाही. हे विद्यमान सरकारला कोणीतरी सांगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पण यांना द्यायचे कुठे आहे? असा सवाल करून आमचे सरकार सत्तेवर असताना साडेसहा हजार कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी वाटप केल्याची आठवण त्यांनी सांगितली. संपूर्ण हयात पक्षात घालवल्यानंतर तेथे न्याय मिळाला नसल्याने माजी आमदार साबणे हे भाजपमध्ये आले असून त्यांचा योग्य तो सन्मान पक्षात राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

माजी मंत्री खोत यांनी विद्यमान सरकार अलीबाबाच्या टोळीसारखे असून कमी वेळात जास्त खाण्याची ते घाई करत असल्याची टीका केली. शेतकऱ्यांनी पाच हजार दोनशे कोटी रुपये भरले. त्यातले फक्त ९०० कोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांना दिले. बाकीचे पैसे गेले कुठे? असा सवाल करून आपले खाऊन दुसऱ्याच्या ताटातले जेवण खाऊन टाकण्याची सवय असणाऱ्या या सरकारला खाली खेचल्याशिवाय शेतकऱ्यांचा उद्धार होणार नसल्याचे ते म्हणाले.

देगलूर-बिलोलीची पोटनिवडणूक परिवर्तनाची नांदी असून शेतकरी विकासाच्या प्रश्नावर सभागृहात नेहमी दिसणारा सुभाष साबणे यांचा आवाज गेल्या काही दिवसापासून दिसेनासा झाला असून आता संधी आली आहे. तो आवाज पुन्हा सभागृहात पाठविण्यासाठी साबणे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. पक्ष प्रवेशानंतर साबणे यांनी माझे जुने हक्काचे घर सोडताना अतीव दुःख होत असल्याचे सांगताना गहिवरुन आले. मात्र, कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्याय, मुस्कटदाबीमुळे मला हा निर्णय घेऊन पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. मतदार मला पुन्हा सेवेची संधी देतील, असा मला विश्वास असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात यापूर्वी मोठ्या प्रमाणात सरंजामशाही होती, मात्र आता हळूहळू अनेकांना त्यांचे सर्व कारणामे कळत असल्याने अनेकजण भाजपत प्रवेश करत आहेत. यापुढे भाजपच्या कार्यकर्त्याकडे बोट दाखवण्याची हिंमत सताधाऱ्यांना होणार नाही व येणाऱ्यांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही खासदार चिखलीकर यांनी दिली. जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. माधव उचेकर यांनी सुत्रसंचालन केले तर सुरेश पाटील ठाणेकर यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.