
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी औरंगाबाद येथील सभेत भाजपवर जोरदार निशाणा साधाला. बाबरी मशिद, काश्मीर, महागाई अशा सर्वच मुद्यांवरून त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेच दिवंगत मोरेश्वर सावे याचा उल्लेख करत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही लक्ष्य केलं. (MLA Atul Save Latest Marathi News)
बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा एकही शिवसैनिक तिथे नव्हता, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी भाजप आमदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवत निशाणा साधला. औरंगाबादमधील आमचे मोरेश्वर सावे हे 1992 मध्ये शिवसैनिकांसह अयोध्येला गेले होते. त्यांचे चिरंजीव आता भाजपमध्ये जाऊन आमदार झाले, असं ठाकरे म्हणाले होते.
अतुल सावे हे हिंदुत्वाच्या मुद्दावर आमदार झाले. आता फडणवीसांची पालखी वाहणाऱ्या सावेंनी त्यांच्यासमोर खरे-खोटे करावे. मोरेश्वर सावे अयोध्येला गेले नसतील तर त्यांनी तसं सांगून टाकावं, असंही ठाकरे म्हणाले. त्यानंतर आता अतुल सावे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
अतुल सावे यांना पलटवार
मुख्यमंत्र्यांनी माझे वडील स्वर्गिय मोरेश्वर सावे यांचा उल्लेख केला. माझे वडील कारसेवक म्हणून संभाजीनगर येथून ट्रेनभरून अयोध्येला गेले होते. त्यावेळी केवळ शिवसेना हा विषय नव्हता. प्रखर हिंदूत्ववाद मांडणारे विश्वहिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना, भाजप अशा सर्व हिंदूत्ववादी संघटनेची लोकं होती, असं अतुल सावे म्हणाले.
तिथे जाऊन आल्यानंतर ते प्रखर हिंदुत्व मांडत होते. पण हे शिवसेनेतील नेत्यांना आवडलं नाही. म्हणून त्यांनी त्यांचं खच्चीकरण केले. त्यांना साधं लोकसभेचं तिकीटही दिलं नाही. मुख्यमंत्र्यांनी काल अर्धीच स्टोरी सांगितली. पूर्ण स्टोरी का सांगितली नाही, असा माझा प्रश्न आहे. तुम्हाला जर एवढा अभिमान होता तर लोकसभेचं तिकीट का दिलं नाही, लोकांनी त्यांना दिलेली धर्मवीर पदवी का स्वीकरली नाही. उलट तुम्ही त्यांचं खच्चीकरण केलं, अशी टीका सावे यांनी केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.