संभाजीराजेंचा त्यांनी 'गेम' केला! दरेकरांनी दाखवलं शरद पवारांकडं बोट

संभाजीराजे आमच्याकडं उमेदवारी मागायला आलेच नाहीत
संभाजीराजेंचा त्यांनी 'गेम' केला! दरेकरांनी दाखवलं शरद पवारांकडं बोट
Pravin Darekar and Sambhajiraje ChhatrapatiSarkarnama

औरंगाबाद : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. पण कोणत्याही पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी यासाठी शिवसेनेकडे बोट दाखवलं आहे. पण त्यांचे पिता शाहू छत्रपती यांनी आता विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस आणि भाजप हेच मागील सूत्रधार असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी खुलासा केला आहे. (Sambhajiraje Chhatrapati latest news update)

दरेकर म्हणाले की, संभाजीराजेंचा सन्मान करत आम्ही त्यांना राज्यसभेत सहा वर्षे संधी दिली. पण त्यांनी स्वत:हून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. शरद पवारांनी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केलेला असताना शिवसेनेने दुसरा उमेदवार देणे हा संभाजीराजेंचा अवमान आहे. महाविकास आघाडीने ठरवून त्यांचा 'गेम' केला.

शाहू छत्रपतींच्या गौप्यस्फोटाबाबत दरेकर म्हणाले की, ते त्यांचे व्यक्तिगत मत असू शकेल. भाजपने कायमच त्यांचा सन्मान केला. संभाजीराजे उमेदवारीसाठी आमच्याकडे आलेच नाहीत. त्यांनी उमेदवारी मागितली असती तर आम्ही वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला असता. शरद पवारांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला होता. महाविकास आघाडीचे ते प्रणेते असल्याने त्यांनी इतर पक्षांशी बोलूनच पाठिंबा जाहीर केला असेल. पण त्यानंतर संजय राऊतांना दुसरा उमेदवार देण्याचं जाहीर केलं. महाविकास आघाडीनं संभाजीराजेंची कोंडी करून त्यांचा अवमान केला. ही सगळी शरद पवारांची खेळी आहे.

संभाजीराजेंना अपक्ष लढवण्याची फडणवीस आणि भाजपची खेळी होती, असा खुलासा शाहूंनी आज पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केला. ते म्हणाले की, या सर्व राजकारणामागे भाजपचाच हात आहे. संभाजीराजेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली नाही, त्यामुळं छत्रपती घराण्याचा अपमान झाल्याचा आरोप होत आहे. पण यामुळं हा छत्रपती घराण्याचा अपमान झाला, असं म्हणता येणार नाही. ती संभाजीराजेंची राजकीय भूमिका होती. त्यामागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपची खेळी होती. संभाजीराजेंना अपक्ष लढावं यासाठी त्यांनी भाग पाडलं.

बहुजन समाजाच्या मतांत विभाजन करण्यासाठी भाजपने हा डाव टाकला होता. संभाजीराजे हे जानेवारी महिन्यापासून राज्यसभेसाठी प्रयत्न करीत होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांनी स्वराज्य संघटनेची स्थापन केली आहे. संभाजीराजेंना आता दीर्घकाळ लढा द्यावा लागणार असून, हा संघर्ष खूप मोठा आहे, असंही शाहू छत्रपतींनी म्हटलं आहे.

Pravin Darekar and Sambhajiraje Chhatrapati
वडिलांच्या भाजपबाबतच्या गौप्यस्फोटावर संभाजीराजेंनी थेटच सांगितलं...

राज्यसभेच्या (Rajya Sabha) उमेदवारीसाठी संभाजीराजेंनी शिवबंधन हाती बांधावे, असा प्रस्ताव शिवसेनेकडून त्यांच्यासमोर ठेवला होता. पण संभाजीराजेंनी त्यास नकार दिल्याने शिवसेनेने कोल्हापुरातील संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी अपक्ष न लढता माघार घेतली. कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने संभाजीराजेंना राज्यसभेसाठी पाठिंबा न दिल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. संभाजीराजेंनीही पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलं होतं.

Pravin Darekar and Sambhajiraje Chhatrapati
संभाजीराजेंचं नेमकं कुठं चुकलं? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

संजय पवार यांनी शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याच्या आशाही संपुष्टात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांत संभाजीराजेंनी मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा केली असल्याचे बोलले जात होते. संभाजीराजेंनी यानंतर स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती. तसेच, पुढील विधानसभा निवडणुका या संघटनेच्या माध्यमातून लढवण्याचे जाहीर केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in