Aurangabad : जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्री मिळाले ? आता पालकमंत्री कोण ?

मुंबईच्या सुभाष देसाई यांच्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आता शिंदे-फडणवीस सरकार हा पॅटर्न बदलतात का? ( Aurangabad Guardian Minister)
Who is the next Guardian Minister News Aurangabad
Who is the next Guardian Minister News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : जिल्ह्याला कधी नव्हे ते तीन कॅबिनेट मंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद अशी महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळ विस्तारात (Aurangabad) औरंगाबाद पुर्वचे आमदार अतुल सावे (Atul Save) यांना गेल्यावेळच्या राज्यमंत्री पदावरून कॅबिनटेमध्ये बढती मिळाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार? याची उत्सूकता लागली आहे.

मंत्रीमंडळ विस्तार रखडल्यानंतर सातत्याने जिल्ह्याला पालकमंत्री नेमा अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. (Abdul Sattar) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला तेव्हा यासंदर्भातील मागणी केली होती. विस्तार लांबत असेल तर किमान पालकमंत्री तरी नेमा, म्हणजे ते कामाला लागतील, अशी सूचना पवारांनी केली होती.

पण त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने १८ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देत विस्तार केला. सरकारमधील दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ९ मंत्री असल्याने आता पालकमंत्री देखील त्याच पद्धतीन दिले जातात का? मग यात काही वेगळे राजकारण केले जाते, हे पहावे लागेल. औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर भाजप पालकमंत्रीपदावर दावा करेल अशी परिस्थिती आहे.

ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्री राहिलेल्या संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार या दोघांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाने आपले लक्ष्य शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादवर केंद्रीत केले आहे हे दिसतेच. पण भाजपला देखील उद्धव सेनेची ताकद या जिल्ह्यातून नष्ट करायची असल्याने पालकमंत्रीपदावर त्यांच्याकडून दावा केला जाऊ शकतो. त्यामुळेच सावे यांना कॅबिनेट पदी बढती देत भाजपने पालकमंत्री पदावर डोळा ठेवला असल्याचे दिसते.

मराठवाड्याची राजधानी आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा असा हा जिल्हा असल्याने कधी नव्हे ते केंद्र आणि राज्याच्या सरकारमध्ये औरंगाबादला मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाला तेव्हापासूनच भाजपने स्थानिक नेत्यांना बळ देण्यास सुरूवात केली होती.

Who is the next Guardian Minister News Aurangabad
'महसूल'साठी चंद्रकांतदादा-विखे पाटलांमध्ये चुरस : खातेवाटपचा अजुनही तिढा कायम

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, यांच्यानंतर जिल्ह्याला डाॅ.भागवत कराड यांच्या रुपाने केंद्रात दुसरे महत्वाचे मंत्रीपद मिळाले. अर्थ खात्याचे राज्यमंत्री झालेल्या डाॅ. कराड यांनी केंद्राच्या अनेक योजना जिल्ह्यात आणत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला अपेक्षित परिणाम साधला होता. रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून दानवे यांनी देखील तेच केले. आता राज्य सरकारच्या माध्यमातून सावेंना पालकमंत्री पद देत भाजप जिल्ह्यावर आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहे.

भाजप शिंदेची सेना हीच खरी शिवसेना असा दावा करत असली तरी न्यायालयाच्या निर्णयानंतरच खरी शिवसेना शिंदेंची की उद्धव ठाकरेंची हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात शिवसेनेची जी पाळेमुळे तळागाळापर्यंत पोहचली आहे, ती पाहता भाजप जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिंदे गटाला देईल, अशी शक्यता वाटत नाही. शिवाय दोन कॅबिनेट मंत्री दिल्यामुळे आता पालकमंत्री पद आम्हाला हवे अशी भूमिका फडणवीस घेऊ शकतात. एकनाथ शिंदे फडणवीसांचा शब्द टाळतील असे वाटत नाही.

शिंदे सेनेच्या ज्या संजय शिरसाट यांनी मंत्रीपदासह पालकमंत्री पदाचीही मागणी लावून धरली होती. त्यांचा पत्ता मंत्रीमंडळातूनच कट झाल्याने आता भाजपचा मार्ग सोपा झाला आहे. इकडे शिंदे गटाचे भुमरे आणि सत्तार मंत्रीमंडळात वर्णी लागली यावरच समाधानी आहेत. सत्तार हे महत्वाकांक्षी असल्यामुळे ते पालकमंत्री पदावर दावा सांगू शकतील, पण टीईटी घोटाळ्यातील आरोपानंतर कसबसे सत्तारांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे ते फार आग्रही राहणार नाहीत, असेही बोलले जाते.

ठाकरे सरकारे सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची सुत्रे आपल्याच हाती ठेवली होती. त्यामुळे दोन मंत्री असूनही तेव्हा मुंबईच्या सुभाष देसाई यांच्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आता शिंदे-फडणवीस सरकार हा पॅटर्न बदलतात का? जिल्ह्याचा पालकमंत्री शिंदे सेनेचा होणार की मग भाजपचे सावे ? यावर जिल्ह्यातील पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com