Aurangabad : आमदार बंब यांच्या सत्कार अन् पुजनाने शिक्षक भांबावले..

शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद मुलांना जगण्याचे बळ देतो. भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल तर शिक्षकांना मुळात स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस असली पाहिजे. (Mla Prashant Bamb)
Bjp Mla Prashant Bamb News Aurangabad
Bjp Mla Prashant Bamb News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : एखाद्या विशेष दिनी सत्कार झाला तर ती व्यक्ती भारावते, आनंदही होते. पण आज शिक्षक दिनी गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचा सत्कार केला तेव्हा ते भारावले नव्हते तर भांबावून गेले होते. (Teacher) याचे कारण म्हणजे शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्यावरुन सुरू असलेला संघर्ष.

नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार बंब यांनी शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयी न राहता फुकटचे घरभाडे उचलण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर बंब यांना शिक्षक व त्यांच्या संघटनांच्या रोषाला देखील समोर जावे लागले.(Marathwada) पिढ्या घडवणारे शिक्षक मुख्यालयी न राहता पिढ्या बरबाद करत आहेत, असा गंभीर आरोप देखील बंब यांनी केला.

हा वाद इतका टोकाला गेला की एका शिक्षक पत्नीने थेट बंब यांना फोन करून आर्वच्य भाषा वापरली आणि तिच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. राज्यातील शिक्षक संघटना आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी यांची ताकद खूप मोठी आहे. त्यामुळे त्यांनी एकवटण्याचा प्रयत्न केला, बंब यांच्याविरोधात मोर्चे, आंदोलन काढून मुख्यालयी राहण्याचा विषय कसा बंद होईल, मुख्यालयी न राहण्याचा अडचणींचा पाढा देखील वाचण्यात आला.

पण बंब त्याला बधले नाही, उलट गांधीगिरी करत त्यांनी शिक्षकांच्या अडचणीत अधिकच वाढ केली. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक दिनाचा मुहूर्त साधत आमदार बंब यांनी आपल्यात मतदारसंघातील रांजणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेच्या घरी जाऊन त्यांचे पूजन केले. विशेष म्हणजे या महिला शिक्षक मुख्यालयीच राहत होत्या.

बंब यांच्या पूजनानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना या शिक्षिकेला बंब यांच्या सत्कार आणि पूजनाचे ओझे जड झाल्याचे जाणवत होते. त्यामुळे अनपेक्षित पणे झालेल्या सत्काराबद्दल छान वाटले एवढीच प्रतिक्रिया देत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. बंब यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील २७ पैकी केवळ ३ ते ४ शिक्षकच मुख्यालयी राहत असल्याचा दावा यावेळी केला.

Bjp Mla Prashant Bamb News Aurangabad
भाजपचं मुंबई प्रेम बेगडी, अमित शहांच्या दौऱ्यावर विरोधीपक्षनेते दानवेंची टीका

शहराला लागून असलेला आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असून देखील शिक्षक मुख्यालयी राहत नाही, हे बंब यांनी कृतीतून दाखवून देत शिक्षकांचा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला. बंब यांनी शिक्षकांची कोंडी केली असली तरी शिक्षक व त्यांच्या संघटना देखील मागे हटायला तयार नाहीत, असे चित्र सध्या आहे. शिक्षकांची बाजू घेणारे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्यासह पदवीरचे आमदार सतीश चव्हाण यांना देखील बंब यांनी अंगावर घेतले.

विधानसभेत आता सगळे आमदार शिकलेले, पदवीधर, पदव्युत्तर झालेले असल्याने या आमदारांची गरज नाही, त्यांचे मतदारसंघ रद्द करा, अशी मागणी करत बंब यांनी राज्यातील सगळ्याच शिक्षक व पदवीधर आमदारांना देखील एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्यामुळे हा संघर्ष अधिक चिघळणार हे स्पष्ट होते.

बंब हे गेल्या तीन टर्मपासून आमदार आहेत. त्यांची कार्यपद्धती ही नेहमीच आक्रमक राहिलेली आहे. त्यांनी मतदारसंघाशिवाय राज्यभरातील अनेक विषयात हस्तक्षेप करत आमदारांची अडचण केल्याचे अनेकदा समोर आले आहे. मग ते रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार असो की मग इतर प्रश्न, बंब यांनी अनेकदा आमदारांची नाराजी ओढावून घेतलेली आहे. आता शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याचा मुद्दा व शिक्षक, पदवीधरचे मतदारसंघच रद्द करा, ही मागणी करत त्यांनी पुन्हा एकदा खबळबळ उडवून दिली आहे.

दरम्यान, शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद मुलांना जगण्याचे बळ देतो. भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल तर शिक्षकांना मुळात स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस असली पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य अशावाद असला पाहिजे. कठोर वास्तवाला सामोरे जाण्याची जिद्द हवी. शिक्षकांसाठी रोजचा दिवस हा शिक्षक दिन असला पाहिजे. तरच चांगले विद्यार्थी घडविले जाऊ शकतात, अशा खोचक शब्दात बंब यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com