Aurangabad : शिवसेनेचा `पिया`, शिंदेचा प्यारा कसा ठरला ? जैस्वालांचे दुसऱ्यांदा बंड..

बाळासाहेबांचा सहवास, मराठवाड्यातील शिवसेनेच्या भरभराटीचा, जडणघडणीचा इतिहास अनुभवलेल्या जैस्वालांनी एकनाथ शिंदेची साथ का दिली असेल? याबद्दल त्यांचे समर्थक देखील चकित आहेत. (Shivsena)
Minister Eknath Shinde-Mla Pradip Jaiswal
Minister Eknath Shinde-Mla Pradip JaiswalSarkarnama

औरंगाबाद : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या झेड्यांचा दांडा मजबुत करण्यात मराठवाडा, विशेषतः औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याने चांगला हातभार लावला. सात पैकी पाच आमदार पैकी दोन मंत्री शिंदे यांच्या गळाला लागले आणि जिल्ह्यातील शिवसेनेला भगदाड पडल्याचे स्पष्ट झाले. अगदी पहिल्यादांच निवडून आलेले बोरनारे यांची बंडाळीला मिळालेली साथ जशी धक्का देणारी ठरली तसाच धक्का शिवसेनेत (Shivsena) `पिया` म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदीप जैस्वाल यांच्या निर्णयाने बसला.

बाळासाहेबांचा सहवास, मराठवाड्यातील शिवसेनेच्या भरभराटीचा, जडणघडणीचा इतिहास अनुभवलेल्या जैस्वालांनी एकनाथ शिंदेची (Eknath Shinde) साथ का दिली असेल? याबद्दल त्यांचे समर्थक देखील आश्चर्यचकित झाले आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेच्या पहिल्याच महापौर निवडणुकीत मतपेटी पळवून खळबळ उडवून देणारे, शहरात कुठेही गडबड झाली, की शिवसैनिकांच्या मदतीसाठी धावून जाणारे, पक्षाने नगरेसवक, महापौर, खासदार आणि आमदार केलेले प्रदीप जैस्वाल या बंडात का सामील झाले? हा प्रश्न राहून राहून सतावतो.

जैस्वालांची ही बंडखोरी तशी पहिली नाही हे देखील इथे मुद्दाम सांगावे लागेल. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल यांचे तिकीट अचानक कापले गेले होते. राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून खैरे आणि जैस्वाल जिल्ह्यात ओळखले जात. शिवाय खैरे यांचे मातोश्रीवर वजन असल्यामुळे त्यांचा शब्द खाली पडू दिला जात नव्हता. खैरे-जैस्वाल उमेदवारीसाठी मुंबईत होते, जैस्वालांना तुम्ही कामाला लागा असा निरोप देऊन पाठवण्यात आले.

जैस्वाल उमेदवारी मिळाल्याच्या आनंदात विमानात बसले आणि मुंबईहून औरंगाबादेत पोहचेपर्यंत जैस्वाल यांची उमेदवारी रद्द झाली होती. विकास जैन यांना उमेदवारी मिळाल्याच्या बातम्या धडकल्या आणि जैस्वाल व त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. आंदोलने झाली, नाराजी नाट्य रंगले. जैस्वालांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अपक्ष लढण्यास सांगितले. जैस्वाल यांनी देखील जोर लावला.

उद्धव ठाकरे यांना हे चांगलेच खटकले. नारळीबागच्या ज्या भागात जैस्वाल यांचे संपर्क कार्यालय होते, त्यालाच लागून असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत जैस्वाल यांचा गद्दार असा उल्लेख केला होता. पण जैस्वाल यांच्यावर अन्याय झाल्याची भावना, त्यांचे सर्व जाती-धर्माच्या लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध या जोरावर अपक्ष लढूनही जैस्वाल यांनी विजय मिळवला होता.

Minister Eknath Shinde-Mla Pradip Jaiswal
Omraje Nimbalkar : `जात, गोत्र अन् धर्म आमचा शिवसेना`, कैलास पाटलांच्या धैर्याला सलाम..

शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा त्यांनी पराभव केला होता. अपक्ष निवडून येत त्यांनी शिवसेनेला त्यांनी चुकीचा निर्णय घेतल्याची जाणीव करून दिली. पण पक्षाने आपली हकालपट्टी केली, आपण आता शिवसेनेत नाही याची सल जैस्वाल यांच्या मनात होती. त्यांचे मन दुःखी होते अन् काही महिन्यातच जैस्वाल पुन्हा स्वगृही परतले. उद्धव ठाकरे यांनी देखील झालंगेलं गंगेला मिळालं म्हणत जैस्वालांचा स्वीकार केला.

जैस्वालांच्या बंडाने धक्का..

एवढेच नाही तर २०१४ मध्ये झालेली चूक दुरुस्त केली आणि जैस्वाल यांना मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली. पण युती तुटली, जैस्वाल यांचे जिवलग मित्र किशनचंद तनवाणी यांनी बंडखोरी करत भाजपकडून उमेदवारी मिळवली. हिंदु मतांची फाटाफूट झाली आणि शहरात एमआयएमचा पहिला आमदार इम्तियाज जलील यांच्या रुपाने निवडून आला. त्यांनतर २०१९ मध्ये पुन्हा शिवसेनेने जैस्वाल यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी पराभवाचे उट्टे काढत एमआयएमचा पराभव केला.

दरम्यान, जैस्वाल यांच्या पत्नीचे निधन झाले आणि ते मानसिकरित्या खचले. ते आमदार असले तरी राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले होते. पक्षाच्या बैठका, कार्यक्रमांना देखील ते क्वचितच हजेरी लावायचे. पण त्यांनी स्वतःला सावरत पुन्हा सक्रीय होण्याचा निर्णय घेतला. पण पुढे त्यांच्या पायाच्या दुखण्याने अंग काढले. त्यामुळे आता देखील ते पक्षाच्या कार्यक्रमात फार कमी दिसायचे.

जैस्वाल आता राजकारणातून निवृत्त होणार असे वाटत असतांनाच त्यांनी थेट एकनाथ शिंदेच्या बंडात सहभागी होणे सगळ्यांनाच धक्का देणारे ठरले. जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषीकेश जैस्वाल हे देखील राजकारणात सक्रीय आहे. युवासेनेचे ते पदाधिकारी आहेत, शिवाय आगामी महापालिका निवडणुकीत ते नगरसेवक होऊ इच्छितात. अशावेळी वडिलांच्या बंडाचा फटका त्यांना देखील बसू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com