Marathwada : अशोक चव्हाण भारत जोडोच्या तयारीत, इकडे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या..

अब्दुल सत्तार आणि अशोक चव्हाण हे अनेक वर्ष एकाच पक्षात होते. त्यामुळे सत्तार यांचे विधान किंवा एखादा दावा किती गांभीर्याने घ्यावा, हे चव्हाण यांना चांगलेच माहित आहे. (Congress Leader Ashok Chavan)
Ashok Chavan-Abdul Sattar News, Aurangabad
Ashok Chavan-Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. सर्वप्रथम नांदेडचे खासदार आणि चव्हाण यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी या संदर्भातील विधान केले होते. यावर `चर्चा कोण करतयं`, अशा मोजक्या शब्दात चिखलीकरांचा दावा खोडून काढला होता. परंतु यानंतरही अधूनमधून चव्हाण नाराज आहेत, ते भाजपमध्ये नक्की जाणार अशा, चर्चा सुरूच आहेत.

Ashok Chavan-Abdul Sattar News, Aurangabad
Aurangabad : महापालिकेत सत्ता आमचीच म्हणणाऱ्या कराडांना इम्तियाज म्हणाले, स्वप्न पहा..

आता राज्याचे कृषीमंत्री आणि कधीकाळी अशोक चव्हाण यांचे विश्वासू राहिलेले अब्दुल सत्तार यांनीच चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशाची कुजबूज सुरू असून ही माहिती आपल्याला त्यांच्याच जवळच्या आमदाराने सांगितल्याचा दावा केला. (Abdul Sattar) सत्तार यांचे अलिकडच्या काळतली विधानं पाहिली तर त्यावर किती विश्वास ठेवावा, हा खरा प्रश्न आहे. पण सत्तार यांनी थेट आमदार अमर राजूकर यांचे नाव घेत चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचा दावा केल्याने पुन्हा एकदा चर्चा झडू लागली आहे.

दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी मात्र यावर आता भाष्य किंवा स्पष्टीकरणच द्यायचे नाही, अशी भूमिका घेतल्याचे बोलले जाते. काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होत आहे. अशोक चव्हाण यांच्याच नांदेड जिल्ह्यातून ही यात्रा राज्यात प्रवेश करणार असल्यामुळे याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांनी देखील गेल्या महिनाभरापासून विविध बैठका, मेळावे घेत भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे.

देगलूरमधून भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आठवडाभर ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे चव्हाण यांनी आपले सगळे लक्ष सध्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनावर केंद्रीत केले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि अशोक चव्हाण हे अनेक वर्ष एकाच पक्षात होते. त्यामुळे सत्तार यांचे विधान किंवा एखादा दावा किती गांभीर्याने घ्यावा, हे चव्हाण यांना चांगलेच माहित आहे.

त्यामुळे सत्तारांच्या विधानवर स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत अजून तरी ते पडलेले नाहीत. काही दिवसांपुर्वी नांदेड मध्येच एका मेळाव्यात माझ्या खानदानाकडे पाहिले तर आम्ही कोणत्या विचारसरणीचे आहोत, हे स्पष्ट होते असे सांगत त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा करणाऱ्यांचा समाचार घेतला होता. काॅंग्रेसमधील अनेक नेत्यांनी देखील चव्हाण हे काॅंग्रेस कधीच सोडणार नाही? असे वेळोवेळी जाहीर केले आहे. त्यामुळे सत्तार यांच्या या नव्या दाव्याला काॅंग्रेस किती गांभीर्याने घेणार? हा खरा प्रश्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com