अशोक चव्हाणांनी देगलूर-बिलोलीकरांना हात जोडले, अन् मतदारांनीही विश्वास दाखवला

(Deglur-Biloli By Election) मतदारांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण आणि अंतापूरकर परिवारावर विश्वास दाखवला. फोडोफोडी करून काहीही साध्य करता येते हा भाजपचा समज देखील देगलूरकरांनी खोटा ठरवला.
Guardian Minister Ashok Chavan
Guardian Minister Ashok ChavanSarkarnama

नांदेड ः देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी खूप महत्वाची होती. राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या या दुसऱ्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीच्या दोन वर्षातील कारभारावर देखील शिक्कामोर्तब होणार होता. तीन पक्ष एकत्रित लढल्यानंतर देखील भाजपला पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत विजय मिळाला होता. त्याचीच पुनरावृत्ती अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यात करण्यासाठी भाजपने आपली शक्तीपणाला लावली होती.

परंतु रावसाहेब अंतापुरकरांच्या आकस्मिक निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना सहानुभूती मिळाली आणि अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा देखील जपली गेली. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर त्याच्या घरातील एखादी व्यक्ती उमेदवार असेल तर ती निवडूणक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा कायम राखण्याचे प्रयत्न अशोक चव्हाण व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले.

पण भाजपने उमेदवार देत निवडणूक लढवली. अशोक चव्हाण यांच्याकडून प्रचारात हा देखील मुद्दा प्रामुख्याने मांडला गेला. एखादी व्यक्ती दगावल्यानंतरही भाजपला त्याच्याशी काही देणेघेणे नाही, त्यांना फक्त राजकारण करायचे आहे हे बिंबवण्यात अशोक चव्हाण यशस्वी झाले. परिणामी जितेश अंतापूरकर यांच्याबद्दलच्या सहानुभूतीत अधिकच वाढ झाल्याचे दिसून आले. भाजपने शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक अधिक गंभीरतेने घेतली.

कारण साबणे हे तीन टर्म आमदार होते, त्यामुळे केवळ सहानुभूतीच्या भरवशावर न राहता महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात नांदेड जिल्हा आणि राज्यात काय कामे केली हे देखील अशोक चव्हाण यांनी मतदारांना पटवून दिले. शिवाय विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी झाला तरी तो तुमची कामे करू शकणार नाही, मुखेडच्या उमेदवाराल कशाला निवडून द्यायचे, जितेश तुमच्याच मतदारसंघातला आहे, उच्चशिक्षित आहे, दारू आणि वाळू वाला नाही, असा जोरदार हल्ला देखील चव्हाण यांनी प्रचार सभांमधून चढवला होता.

उच्चशिक्षित, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप नाहीत, ज्याची पाटी कोरी आहे, अशा उमेदवाराला निवडून द्या, या त्यांच्या भावनिक आवाहनाला देखील मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे अंतापूरकर यांना मिळालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. तुम्ह जितेशला निवडून द्या, तुमचे प्रश्न मी सोडवल्या शिवाय राहणार नाही, त्याने माझ्याकडे फाईल आणावी आणि मी डोळे झाकून त्यावर सही करावी, इतक्या अधिकाराने तुम्ही काम करून घेऊ शकता, असा विश्वास देखील चव्हाण यांनी मतदारांच्या मनात निर्माण केला होता.

वंचितला मत म्हणजे भाजपला फायदा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात काॅंग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशवंत भिंगे अशी तिरंगी लढत झाली होती. वंचित बहुजन आघाडीने एक लाखाहून अधिकची मते घेतल्याने या मतविभाजनाचा थेट फायदा भाजपच्या चिखलीकरांना झाला होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा पराभव करून ते सहज विजयी झाले होते.

पोटनिवडणुकीत ही चूक पुन्हा करू नका, मला न तुला घाल..अशी तेव्हा अवस्था झाली होती. आता मतांची फाटाफूट नको, माझ्यावर काही राग असेल तो तुम्ही काढला, पण ही निवडणूक माझी नाही तर जितेश अंतापूरकरची आहे. रावसाहेब अंतापूरकरांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, कोरोनामध्ये लोकांना काही कमी पडू नये म्हणून त्यांनी जोखीम पत्करली आणि त्यांना कोरोनाने गाठले. अशा व्यक्तीच्या घरातील व्यक्तीला काॅंग्रेसने उमेदवारी दिली आहे, रावसाहेबांना श्रद्धांजली म्हणून मतदान करा, असे केलेले आवाहन देखील कामी आले.

Guardian Minister Ashok Chavan
मी दाखवतो कोण पार्ट्या करतात; मलिकांना आव्हान देत राणेंचा ठाकरेंवर बाण

अशोक चव्हाण यांनी भाजपवर हल्ला चढवतांना महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीचा पाढा देखील वाचला. नांदेड जिल्ह्याचा विकास आपल्याशिवाय कुणी करू शकत नाही हे सांगतांना त्यांनी कोरोना काळात जिल्ह्यात आणि देगलूर-बिलोली मतदारसंघात केलेल्या कामांचे पुरावे जनतेसमोर ठेवले. त्यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण आणि अंतापूरकर परिवारावर विश्वास दाखवला. फोडोफोडी करून काहीही साध्य करता येते हा भाजपचा समज देगलूर-बिलोलीच्या मतदारांनी खोटा ठरवत महाविकास आघाडीच्या दोन वर्षातील कामगिरीवर शिक्कामोर्तब केल्याचेच या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com