भुमरे-दानवे विरोधात जाताच सत्तारांसाठी खैरे झाले आदरणीय नेते..

सत्तार-खैरे यांच्या या युतीमागे दोघांचाही स्वार्थ दडलेला आहे. खैरे यांना दानवे-भुमरेंना धडा शिकवायचा आहे, तर सत्तार यांना दुध संघात आपल्या सोबत झालेल्या गद्दारीचा बदला घ्यायचा आहे. (Sattar-Khaire)
Chandrakant Khaire-Abdul Sattar
Chandrakant Khaire-Abdul SattarSarkarnama

औरंगाबाद : राजकारणात कायम कुणी कुणाचा शत्रु आणि मित्र नसतो असे म्हटले जाते. औरंगाबाद शिवसेनेसाठी हे तत्व तंतोतंत लागू पडते आहे. (Shivsena) गेली चाळीस वर्ष एकनिष्ठपणे शिवसेनेत काम करत असलेले दोनवेळा आमदार, चारवेळा सलग खासदार, राज्यात मंत्री राहिलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अडीच वर्षापुर्वी पक्षात दाखल झालेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यात सध्या चांगलेच गुळपीठ झाले आहे.

शिवबंधन हाती बांधल्यानंतर पक्षाची कोणतीच बंधने न पाळता जिल्हाभरात मुक्त संचार करत जिल्ह्यातील शिवसेनेची सुत्रं आपल्या हाती घेण्याची महत्वाकांक्षा उराशी बाळगत सत्तार यांनी आपली वाटचाल सुरू केली. मार्गात येणाऱ्याला आडवं करत सत्तार यांची घोडदौड सुरू असतांना त्यांना शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचे खतपाणीही मिळाले.

चंद्रकांत खैरे यांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे आमदार अंबादास दानवे, संदीपान भुमरे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत सत्तार म्हणतील ती पुर्व दिशा अशी भूमिका घेतली. त्यामुळे सत्तारांचे फावले, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद आपल्या समर्थकांना देत त्यांनी जिल्हा बॅंकेची सगळी सुत्र आपल्या हाती घेतली.

भाजपचे हरिभाऊ बागडे यांचा काटाही दानवे-भुमरे-काळे या त्रिकुटाच्या मदतीने काढला. पण उपाध्यक्ष पदावरही सत्तार यांनी आपल्याच माणसाची वर्णी लावल्याने दुखावल्या गेलेल्या भुमरे-दानवे यांनी नंतर सत्तार पासून सुरक्षित अंतर राखणे सुरू केले. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सत्तारांना धडाही शिकवला. पण असे काही घडू शकेल याची पुसटशीही कल्पना नसलेल्या सत्तार यांच्यासाठी हा मोठा धक्का होता.

दूध संघातील उपाध्यक्षपद आपल्या समर्थकाला मिळू नये, यासाठी भुमरे-दानवे-बागडे आणि काळे एकत्र आल्याचा सर्वात मोठा धक्का सत्तारांना बसला आणि त्यांनी या चौघांना थेट धमकीच दिली. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या वेळी ज्या खैरेंना डावलून सत्तार-भुमरे-दानवे यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक लढवली, सत्ता मिळवली त्याच शिवसेनेतील तीन नेत्यांमध्ये दूध संघाच्या निवडणूकीत फूट पडल्याचे दिसून आले.

दूध संघातील समर्थकाचा पराभव जिव्हारी लागल्याने सत्तार हे भुमरे-दानवे यांच्यावर पलटवार करण्याची संधी शोधत आहेत. त्यासाठी शिवसेनेत माझा एकच नेता आहे, ते म्हणजे उद्धवजी ठाकरे, इतर कुणी माझा नेता नाही, अशी भाषा वापरणाऱ्या सत्तारांनी आता चक्क चंद्रकांत खैरे हे आपले आदरणीय नेते असल्याचे सांगणे सुरू केले आहे.

तर दोन वर्षापुर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आदेश धाब्यावर बसवून डोणगांवकर यांना पुन्हा अध्यक्ष करण्याची खेळी करणाऱ्या सत्तार यांचा उल्लेख खैरे यांनी हिरवा साप असा केला होता. आता हाच हिरवा साप खैरै यांच्यासाठी एक सच्चा शिवसैनिक आणि ज्यांच्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद वाढली असा नेता वाटू लागला आहे.

Chandrakant Khaire-Abdul Sattar
सोयगाव नगरपंचायत : शिवसेनेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष दोघेही बिनविरोध

अर्थात सत्तार-खैरे यांच्या या युतीमागे दोघांचाही स्वार्थ दडलेला आहे. खैरे यांना दानवे-भुमरेंना धडा शिकवायचा आहे, तर सत्तार यांना दुध संघात आपल्या सोबत झालेल्या गद्दारीचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे शिवतेज संवाद मोहिमेच्या निमित्ताने खैरे-सत्तार हे दोघे एकमेकाच्या गळ्यात गळे घालून फिरतांना दिसत आहेत.

सोयगांव नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची आज बिनविरोध निवड झाली. या दोन्ही पदावर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी चंद्रकांत खैरे थेट सोयगांवात दाखल झाले होते. नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा सत्कार सत्तार यांनी खैरेंच्या हस्ते घडवून आणला.

विजयी मिरवणूकीतही खैरे जीपमध्ये उपस्थितीत होते. एवढेच नाही तर त्यांनी सत्तार यांना लाडू भरवत त्यांचे तोंडही गोड केले. आता सत्तार- खैरे यांच्यातील हा गोडवा किती दिवस कायम राहतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com