
बीड : दिल्ली वाऱ्या करण्यापेक्षा मंत्रिमंडळ विस्तार करून शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना मदत देण्याचा मोठेपणा सरकारने दाखवावा. (Beed) इथे दोनच व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून राज्याचे सरकार चालवत असून ते प्रत्येक खात्याशी संबंधित प्रत्येक नागरिकांचे समाधान करू शकत नाहीत, याची त्यांना जाणीव असायला हवी, अशा स्पष्ट शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारला टोला लगावला.
अजित पवार यांनी रविवारी अंबाजोगाई व परळीचा दौरा केला. परळीत त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पुजा केली. (Marathwada) यानंतर त्यांनी अंबाजोगाई तालुक्यात गोगलगाईंच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तालुक्यासह साधारण साडेसहा हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर गोगलगाईंच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.
गोगलगायीनी शेंडे खाऊन पिकांचे नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी तीन - चार वेळा पेरण्या, विविध उपाय केले तरीही गोगलगायींचा प्रादुर्भाव आटोक्यात येईना. या पद्धतीच्या नुकसानीचा पीक विमा निकषांमध्ये समावेश नसून, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने गोगलगायीचे नियंत्रण करणे व दुबार पेरणीसाठी जमीन तयार करून पेरणी करणे यासाठी विशेष आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी आहे.
याबाबत प्रशासनाने तातडीने आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा व राज्य सरकारने या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. पवार म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार नाही, जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत त्यामुळे पीकविमा, कृषी कर्ज, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अशा अनेक बाबी प्रलंबित आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी नुसत्या दिल्ली वाऱ्या करू नयेत. तर लवकरात लवकर मंत्रीमंडळाचा विस्तार करून सामान्यांना मदत देण्याचा मोठेपणा दाखवावा. दरम्यान, वैद्यनाथ दर्शनानंतर त्यांनी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संवाद साधला. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, संजय दौंड,बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण, राजकिशोर मोदी आदींची उपस्थिती होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.