
औरंगाबाद : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. यावरून राज्यात वादंगही निर्माण झाले, परंतु राज्यपालांचे बोलणे काही केल्या थांबत नाहीये. (Maharashtra) मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर मुंबई राज्याची आर्थिक राजधानी राहणार नाही, असे खळबळजनक विधान करून कोश्यारी यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.
राज्यभरातून त्यांच्यावर सर्वपक्षीय टीकेची झोड उठवली जात असतांना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी देखील राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. महाराष्ट्र हे एक महान राष्ट्र आहे, तुमची खुर्ची आणि ज्या पक्षाचा अजेंडा घेऊन तुम्ही वारंवार महाराष्ट्र विरोधी वक्तव्य करत आहात, त्या पक्षाहूनही हे राज्य मोठे आहे. (Bhagat Singh Koshyari) तेव्हा राज्याविषयी बोलतांना जरा सांभाळून बोला, असा इशाराच इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
राज्यपालांच्या मुंबईतील एका कार्यक्रमातील राज्याविषयी केलेले विधान हे संताप आणणारे आहे. भाजपने देखील राज्यपालांच्या त्या विधानाशी आपण सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कोश्यारी यांच्या या विधानाचा निषेध करत त्यांना राष्ट्रपतींनी पुन्हा माघारी बोलवावे, अशी मागणी लावून धरली आहे.
एमआयएमने देखील कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर टीका केली आहे. इम्तियाज जलील म्हणाले, राज्यपाल कोश्यारी हे सातत्याने महाराष्ट्रविरोधी वक्तव्य करत आहेत. एक अजेंडा घेऊन ते राज्यात आले की काय ? अशी शंका या निमित्ताने निर्माण होते. एका संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने राज्याच्या हिताचा विचार करणे अपेक्षित आहे, पण कोश्यारी यांनी गेल्या दीड-दोन वर्षात केलेली विधानं पाहिली तर ते एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या भूमिकेत वावरतांना दिसले आहेत.
सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कोश्यारी यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, की महाराष्ट्र हे एक महान आणि मोठे राष्ट्र आहे. तुमच्या खुर्ची आणि तुम्ही ज्या पक्षाचा अजेंडा राबवत आहात, त्या पक्षा पेक्षाही महाराष्ट्र मोठा आहे. तेव्हा या राज्याबद्दल बोलतांना आपण सांभाळून बोललं पाहिजे. या निमित्ताने माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील विनंती आहे, की महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करता, तेव्हा त्यांच्यामध्ये काय क्वालिटी असल्या पाहिजे, याचा देखील विचार करावा, असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.