शिवशाहीर पुरंदरेंच्या अस्थींचे ११ किल्ल्यांवर विसर्जन करणार

रायगड, राजगडसह एकूण ११ किल्ल्यांवर या अस्थींचे विसर्जन करणार असल्याचे मनसेने सांगितले आहे.
शिवशाहीर पुरंदरेंच्या अस्थींचे ११ किल्ल्यांवर विसर्जन करणार
Raj Thakrey with late Babasaheb PurandareSarkarnama

पुणे : जेष्ठ इतिहासकार आणि साहित्यिक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले आहे. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काल दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आता त्यांच्या अस्थींचे विसर्जन ११ किल्ल्यांवर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, पन्हाळगडसह एकूण ११ किल्ल्यांवर या अस्थींचे विसर्जन करणार असल्याचे सांगितले आहे. पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही फेसबुक पोस्टमधून या अस्थी राजगडावर जाणार असल्याचे सांगितले आहे.

काल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची माहिती मिळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झाले होते. बाबासाहेबांच्या घरी जावून त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले होते. सोबतच राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरूनही बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यानंतर आज पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात शिवशाहीरांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच इतिहासप्रेमी, बाबासाहेब पुरंदरेप्रेमी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची रांग लागली होती.

शिवचरित्राच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रात घरोघरी पोचले. त्यांचे ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकामुळे देशभरात छत्रपतींच्या चरित्राची पारायणे केली गेली. ‘जाणता राजा’ या महानाट्याने इतिहास घडवला. जगभरात प्रचंड लोकप्रियता आणि आदर प्राप्त केला. वयाची नव्वदी उलटल्यानंतरही त्याच्या वाणीतील आणि विचारांतील उत्साह कायम होता.

Raj Thakrey with late Babasaheb Purandare
...आणि बाबासाहेब पुरंदरेंची माहिती ऐकून राज ठाकरे भारावले!

आपल्या एका विशिष्ट शैलीने गेल्या साठ वर्षांपासून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र्य महाराष्ट्रातील घराघरात पोचविले. अमोघ वक्तृत्वाने ऐकणाऱ्या समोर इतिहास उभा करण्याचे कसब त्यांच्यात होते. बाबासाहेब म्हणजे उत्साहाचा धबधबा होते. कोरोनाचा दीड वर्षाचा काळ सोडला तर या वयातदेखील ते कायम व्यग्र होते. व्याख्याने, सभांना ते या वयातही उत्साहाने उपस्थित असायचे. या वयातही सलगपणे दीड-दोन तास बोलण्याची त्यांची सवय होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in