अजितदादा कोकणच्या दौऱ्यावर असतानाच राष्ट्रवादीला मोठा झटका

सुरेश लाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
अजितदादा कोकणच्या दौऱ्यावर असतानाच राष्ट्रवादीला मोठा झटका
Suresh LadSarkarnama

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कोकणच्या दौऱ्यावर असतानाच पक्षाला मोठा झटका बसला आहे. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड (Suresh Lad) यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हा राष्ट्रवादीला विशेषतः रायगडचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना मोठा धक्का मानला जात आहे. (Suresh Lad resigns as NCP Raigad District President)

कर्जतचे माजी आमदार असलेले सुरेश लाड यांच्या नावाची काही दिवसांपूर्वी सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी चर्चा होती. मात्र, त्या महामंडळावर अद्याप त्यांची नियुक्ती झालेली नाही. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे पत्रात लाड यांनी नमूद केले आहे. पण, त्यांच्या राजीनाम्यामागे काहीतरी राजकीय कारण असावे, अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

Suresh Lad
बाळासाहेब पाटलांनाही शशिकांत शिंदेंच्या पराभवाचे दुःख

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते दिवेआगारमध्ये सुवर्ण गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते कोकणात असतानाच रायगडच्या जिल्हाध्यक्षाने राजीनामा देणे हे राष्ट्रवादीसाठी धक्कादायक मानले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकी लक्षात घेऊन खासदार तटकरे यांनी कोकणात विशेषतः रायगड लोकसभा मतदारसंघात पक्ष बांधणी जोरात सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी इतर पक्षातील ताकदवान नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत. दुसरीकडे पक्षातील त्यांचे खंदे समर्थक मानले जाणारे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनीच राष्ट्रवादीच्या जिलाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रायगडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Suresh Lad
शशिकांत शिंदेंचा ठरवून करेक्ट कार्यक्रम झाला?

शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुरेश लाड यांचा पराभव केला होता. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्तेत असूनही कर्जत मतदारसंघात आमदार थोरवे विरुद्ध माजी आमदार लाड यांच्यामध्ये कायमच संघर्ष पहायला मिळत आहे. माजी आमदार लाड हे नेमके कोणत्या कारणामुळे नाराज आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in