Sindhudurg ZP : राणे समर्थक गोट्या सावंत, संजना सावंत यांना फटका

Sindhudurg ZP News : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 55 मतदार संघासाठी आज आरक्षण सोडत निघाली आहे.
Sindhudurg ZP  Election Latest News
Sindhudurg ZP Election Latest News Sarkarnama

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या (Sindhudurg ZP) 55 मतदार संघासाठी आज आरक्षण (Reservation) सोडत निघाली. या सोडतीत ओरोस बुद्रुक व शिरगांव हे दोन मतदारसंघ सलग दुसऱ्यावेळी अनुसूचित जातीसाठी राखीव झाले असून नाटळ आणि नांदगाव या अन्य दोन मतदारसंघात हेच आरक्षण पडले आहे.

एकूण 28 जागा महिलांसाठी राखीव झाल्या असून दोन अनुसूचित जाती, सात नागरिकांचा मागास प्रवर्ग व 19 सर्वसाधारण महिला असा यात समावेश आहे. या आरक्षणाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत तसेच संतोष साटविलकर, प्रदीप नारकर अशा अनेक इच्छुक मातब्बरांना मतदारसंघ गमवावे लागले आहेत.

Sindhudurg ZP  Election Latest News
शिवसेनेत अखेर फूट पडलीच, मुंबईत पोहोचलेले ते २६ जण शिंदे गटात !

जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत ही सोडत निघाली. यावेळी सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी रवींद्र मठकर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, भाजपचे एकनाथ नाडकर्णी, महेश सारंग, संदीप मेस्त्री, मनोज रावराणे, संदीप साटम, अमरसेन सावंत, जयभारत पालव आदी राजकीय पुढारी उपस्थित होते.

सुरुवातीला सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी रवींद्र मठकर आरक्षण पद्धत समजावून सांगितली. यात अनुसूचित जाती चार, नागरिकांचा मागास प्रवर्ग 14 एवढे प्रवर्ग आरक्षण राहील. या आरक्षणात 50 टक्के महिला आरक्षण राहील. त्यानंतर उर्वरित 37 जागांमध्ये 19 जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव राहतील, असे सांगितले. त्यानंतर प्रथम अनुसूचित जातीसाठी ओरोस बुद्रुक, नाटळ, नांदगाव व शिरगांव हे चार मतदार संघ प्राधान्यक्रमाने आरक्षित झाल्याचे जाहीर करण्यात आले. या चार मतदार संघातून चिमुकली आराध्या हिच्या हस्ते दोन महिला राखीव जागांसाठी चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. यात शिरगांव व नाटळ या दोन मतदारसंघांची नावे आली.

Sindhudurg ZP  Election Latest News
`..तेव्हा उद्धव ठाकरेंनी चार माणसे ठेवून खाजवून घ्यायला पहिजे होते...'

त्यानंतर पुन्हा प्राधान्यक्रमाने नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 14 मतदारसंघ जाहीर करण्यात आले. यात खारेपाटण, कलमठ, कळसुली, विजयदुर्ग, नाडण, कुणकेश्वर, आचरा, नेरूर तर्फ हवेली, शिरोडा, माडखोल, आरोंदा, बांदा, मणेरी, माटणे या मतदार संघाचा समावेश आहे. त्यानंतर आराध्या हिच्या हस्ते पुन्हा चिठ्ठी टाकून सात जागांसाठी महिला आरक्षण काढण्यात आले. यामध्ये कलमठ, कळसुली, नाडण, आचरा, माडखोल, आरोंदा, मणेरी या मतदार संघाची नावे आली. हे अठरा मतदार संघ राखीव झाल्यानंतर उर्वरित 37 मतदार संघातून प्राधान्य क्रमाने सर्वसाधारण महिलांसाठी 19 जागांसाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये कोळपे, लोरे, फोंडा, हरकुळ बुद्रुक, पोंभूर्ले, किंजवडे, सुकळवाड, गोळवण, पेंडुर, आंब्रड, कडावल, तुळसुली तर्फ माणगाव, तेंडोली, झाराप, नेरूर कर्याद नारुर, आडेली, कोलगांव, इन्सुली, मळेवाड या मतदार संघाचा समावेश आहे. उर्वरित कोकिसरे, कासार्डे, जानवली, पडेल, मिठबाव, आडवली -मालडी, मसुरे - मर्डे, वायरी - भूतनाथ, कसाल, माणगाव, म्हापण, तुळस, मातोंड, उभादांडा, आंबोली, तळवडे, माजगाव, साटेली - भेडशी या मतदारसंघांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती आरक्षणावर आक्षेप

मागच्या पाच वर्षांत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या ओरोस बुद्रुक व शिरगाव या दोन्ही मतदारसंघात सलग दुसऱ्या वेळी तेच आरक्षण राहिल्याने भाजपचे संदीप साटम व वंचित बहुजन विकास आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. या मतदार संघात अनुसूचित मतदार जास्त असल्याने त्यात बदल करण्याची मागणी आपण 15 दिवसांपूर्वी केली होती, असे परुळेकर यांनी सांगितले. या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयाने निर्णय दिला तरी बदल होत नसल्याचे सांगितले. मात्र, जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी तुमची तक्रार असल्यास आक्षेप घेण्यासाठी मुदत दिली आहे. त्यावेळी नोंदवा असे सांगितले.

असे काढण्यात आले आरक्षण

अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षण काढण्यात आले. हे आरक्षण काढताना 2002, 2007, 2012 व 2017 मधील आरक्षणाचा विचार करण्यात आला. 2002 मध्ये आरक्षण असल्यास पहिला टप्पा, 2007 मध्ये आरक्षण असल्यास दुसरा टप्पा, 2012 मध्ये आरक्षण असल्यास तिसरा व 2017 मध्ये आरक्षण असल्यास चौथा टप्पा असे चार टप्पे काढण्यात आले. आवश्यक जागा पहिल्या टप्प्यात न मिळाल्यास दुसऱ्या टप्प्यात घेतल्या गेल्या. तेथे कोठा पूर्ण न झाल्यास तिसरा व चौथा टप्पा अनुक्रमे घेण्यात आला.

ओरोस, शिरगाव पुन्हा आरक्षित

मागील पाच वर्षात अनुसूचित जातीसाठी आरक्षित असताना ओरोस बुद्रुक व शिरगाव पुन्हा त्याच आरक्षणासाठी आरक्षित झाले आहे. याबाबत खुलासा करताना सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी मठकर यांनी, या दोन्ही मतदार संघात मागील पाच वर्षात आरक्षण असले तरी आता आपले 50 ऐवजी 55 मतदारसंघ झाले आहेत. त्यामुळे मतदार संघातील गावे फुटली आहे. मतदार संघाची नावे तीच असलीतरी गावे बदलली आहेत. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ लोकसंख्येच्या अटीनुसार पुन्हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in