शरद पवारांवरील टीका भोवणार; अनंत गीते डेंजर झोनमध्ये

निमंत्रण मिळाले तरच दसरा मेळाव्याला जाईन, असे गीते म्हणाले आहेत.
शरद पवारांवरील टीका भोवणार; अनंत गीते डेंजर झोनमध्ये
Anant Gite & CM Uddhav Thackeray

चिपळूण : माजी केंद्रीय मंत्री व शिवसेनेचे नेते अनंत गीते (Shivsena Leader Anant Gite) यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) नाराज असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील टीका त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गीतेंना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही स्थान मिळणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. गीते यांनीही निमंत्रण मिळाले तरच मेळाव्याला जाईन, असे सांगितल्याने ते डेंजर झोनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, आमदार, महापौर आणि नगरसेवक यांनाच उपस्थित राहणार आहेत. मात्र, शिवसेना नेते रामदास कदम आणि अनंत गीते मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गीते यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मला निमंत्रण आले तर मी मेळाव्याला जाणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

Anant Gite & CM Uddhav Thackeray
दसरा मेळाव्यात पंकजा उत्स्फूर्तपणे बोलणार...पण निशाण्यावर कोण राहणार?

अनंत गीते यांनी श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्षप्रवेश कार्यक्रमात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राज्यात स्थापन झालेली महाविकास आघाडी आपण मानत नसल्याचे ते म्हणाले होते. रायगड लोकसभा मतदारसंघात गीतेंचा पराभव झाला आहे. तेव्हापासून त्यांचे पक्ष संघटनेत ते फारसे सक्रीय नसल्याचे बोलले जाते. त्यातच त्यांनी पवारांविषयी केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री गीतेंना मेळाव्याला बोलवणार की न बोलवून इशारा देणार, याबाबत उत्सुकता आहे.

रामदास कदमही डेंझर झोनमध्ये

रामदास कदम हेही सध्या डेंजर झोनमध्येच आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांना अनिल परब यांच्या विरोधात कदम यांनीच आवश्यक माहिती पुरवली, असा गंभीर आरोप कदमांवर आहे. दापोलीचे माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी हा आरोप कदम यांच्यावर केला होता. हा आरोप करताना त्यांनी एक ऑडिओ क्लिपही प्रसिद्ध केली होती.

Anant Gite & CM Uddhav Thackeray
दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार?

या क्लिपमध्ये किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचा दावा केला गेला आहे. या क्लिपनंतर कदम अडचणीत आले आहेत. त्यांनी हा आवाज आपला नसल्याचे सांगत सावरासारव केली आहे. परब हे आपले चांगले मित्र असल्याचेही ते म्हणाले आहेत. पण त्यांच्याविषयी मुख्यमंत्री नाराज असल्याने त्यांनाही मेळाव्याला बोलवले जाणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. गीते व कदम हे दोन्हीही नेते कोकणातील मातब्बर नेते मानले जातात.

Related Stories

No stories found.