
लांजा (जि. रत्नागिरी) लांजा नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष आणि सात नगरसेवक (corporator) यांनी केलेल्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या तीन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टीची घोषणा केली. तसेच शिवसेना आणि जनतेशी प्रतारणा करून पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नगराध्यक्ष आणि सात नगरसेवकांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे, असे थेट आव्हान दिले आहे. (Shiv Sena expulsion of three including two corporators from the party)
लांजा नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष मनोहर बाईत आणि उद्धव ठाकरे गटाच्या सात नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. १६) प्रवेश केला. शिवसेनेतील या पक्षांतर्गत बंडाळीमुळे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लांजा शिवसेना शाखेत त्यांनी शनिवारी (ता. १७) पत्रकार परिषद घेतली.
आमदार साळवी म्हणाले, ‘‘आजवर आमदार या नात्याने लांजा नगरपंचायतीला आपण २२ कोटींचा निधी दिला आहे. असे असतानाही ज्यांनी पक्षाशी प्रतारणा केली, गद्दारी केली अशा नगराध्यक्ष बाईत आणि सात नगरसेवकांनी त्यांच्यावर काय अन्याय झाला आहे, हे व्यासपीठावर येऊन जाहीर करावे. ज्या मतदार, शिवसैनिकांनी तुमच्या विजयासाठी घाम गाळला आणि ज्या शहरातील जनतेने शिवसेना या धनुष्यबाणावर मतदान करून तुम्हाला निवडून दिले त्या जनतेशी तुम्ही प्रतारणा केली आहे. शिवसेनेशी गद्दारी केली आहे आणि म्हणूनच तुम्हाला या पदावर राहण्याचा अधिकार नाही. तुमच्यात जर हिंमत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा. ही जनता जनार्दनच तुम्हाला घरचा रस्ता दाखवेल.’’
या वेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, लांजा तालुकाप्रमुख संदीप दळवी तसेच नगरपंचायतीमधील गटनेत्या पूर्वा मुळ्ये, शहरप्रमुख गुरूप्रसाद देसाई, नगरसेवक स्वरूप गुरव, लहू कांबळे, यामिनी जोईल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
पक्षाशी गद्दारी करणाऱ्या शिवसेनेचे शहर सचिव प्रसाद भाई शेट्ये, नगरसेवक तथा उपशहरप्रमुख सचिन डोंगरकर आणि नगरसेविका तथा शिवसेना युवती शहर संघटिका दुर्वा भाई शेट्ये यांची हकालपट्टी करत असल्याचे साळवी यांनी जाहीर केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.