शरद पवार सर्वांना पुरून उरतील : जयंत पाटील

जयंत पाटील (Jayant Patil) यांची भाजपवर टीका
Jayant Patil
Jayant Patilsarkarnama

रायगड : काल एका नेत्याने ठाण्यात सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर सर्वात जास्त टीका केली. राष्ट्रवादी हा सर्वांसाठी काम करणारा पक्ष आहे, अठरापगड जातींना सोबत घेऊन विकास करणारा पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रवादीवर हल्ला केला जात आहे. मात्र, शरद पवारसाहेब (Sharad Pawar) या सर्वांना पुरून उरतील, अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज ता. (१३) पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, भाजपच्या सत्ताकाळात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पेट्रोल १२० रुपयांवर गेले आहे. श्रीलंकेच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा प्रवास सुरू झाला आहे. त्यावर कोणी बोलायला तयार नाही. इथे काय तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय च्या धाडी या मुद्द्यांवरच चर्चा घडवली जात आहे, अशी टीका त्यांनी भाजवर केली.

Jayant Patil
चार दिवसांनी प्रगटलेले सोमय्या म्हणाले, होमवर्क करण्यासाठी भूमिगत झालो होतो

बेरोजगारीचे काय? महागाईचे काय? महिलांवरील अत्याचाराचे काय? या मूळ प्रश्नांना सोयीस्कर बगल दिली जात आहे. आपल्याला या विरोधात आवाज उठवण्यासाठी कार्यकर्त्यांची चांगली फळी निर्माण करायची आहे, असे पाटील यांनी सांगितले. परिवाराचा संवाद होणे गरजेचे आहे. परिवारात काय सुरू आहे, याची माहिती घेणे गरजेचे आहे. म्हणून राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याचे आम्ही आयोजन केले आहे. गडचिरोलीच्या अहेरीपासून सुरू झालेल्या दौऱ्याची येत्या २३ तारखेला कोल्हापुरात पवारसाहेबांच्या उपस्थितीत सांगता होणार असल्याचे त्यांनी सांगितले. इथली व्यवस्था जीर्ण आणि कमकुवत झाली आहे. तिला बळकट करण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उचलायला हवा, असेही पाटील म्हणाले. आज बरेच जण विविध पक्षांतून राष्ट्रवादीत आले आहेत. मी त्यांना आश्वासन देऊ इच्छितो की राष्ट्रवादीमध्ये तुमचा योग्य सन्मान होईल. आपण एकत्रितपणे राष्ट्रवादी पक्षाला नंबर एकचा पक्ष बनवू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड लाट असताना रायगडवासियांनी मला साथ दिली आणि दिल्लीत पाठवले. मला खासदार म्हणून निवडून देण्यात महाडचा सिंहाचा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. तळागाळातील कार्यकर्ता कामाला लागला होता, म्हणून हे यश आपल्याला मिळवता आले. याबद्दल तटकरे यांनी महाडवासियांचे आभार मानले.

जयंत पाटील यांनी पक्ष बांधण्याचा एक उपक्रम हाती घेतला आहे. बुथ लेव्हलला पक्ष बांधण्यासाठी ते राज्यभर फिरत आहेत. आपण त्यांना साथ देऊया. बुथवर कार्यकर्ते असणे फार महत्त्वाचे आहे. येत्या काळात या मतदारसंघातही आपल्याला संघटना मजबूत करायची आहे, असेही तटकरे यांनी सांगितले. संघटना मजबूत झाली, कमिट्या तयार झाल्या तर पक्षाचे अस्तित्व दिसून येईल. म्हणून लवकरात लवकर आपण या कमिट्या तयार करू आणि जयंत पाटील यांना अपेक्षित असलेली संघटना निर्माण करू, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

Jayant Patil
बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर तेव्हा टीका केली, याचा अभिमानच!

या वेळी पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), आमदार अनिकेत तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कार्याध्यक्ष मधुकर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंडे, निरीक्षक संजय वढावकर, अजय बिरवाडकर, महाड विधानसभा अध्यक्ष बाळाशेठ खानविलकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष निकम, प्रमुख संघटक चंद्रकांत जाधव निलेश महाडिक, कोकण विभागीय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष किरण शिखरे, युवती अध्यक्ष सायली दळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com