चिपी विमानतळाचे उद्घाटन आणि राणेंना आली बाळासाहेब ठाकरेंची आठवण!

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी आपल्याला कोकणात का पाठविले होते, हे नारायण राणे (Narayan Rane) यांनी सांगितले.
चिपी विमानतळाचे उद्घाटन आणि राणेंना आली बाळासाहेब ठाकरेंची आठवण!
Narayan Ranesarkarnama

मुंबई : कोकणातील चिपी विमानतळाचे (Chipi Airport) उद्घाटन होत असताना अपेक्षेप्रमाणे राजकीय वाद उसळून आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी या उदघाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शिवसेनेला लक्ष्य केले. सेनेकडूनही तसेच प्रत्युत्तर मिळाले. यामुळे हा कार्य़क्रम राजकीय वादातच पार पडणार का, अशी शंका येऊ लागली आहे.

हा वाद झडत असताना दुसरीकडे राणे यांनी या विमानतळाच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले आहे. एवढेच नव्हे तर कोकणाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे केले आहे. पत्रकार परिषदेत शिवसेनेवर तुटून पडणाऱ्या राणे यांनी या पोस्टद्वारे राजकीय वाद होणार नाही, याची काळजी घेतली आहे.

Narayan Rane
`माझे नाव किती छोट्या अक्षरात छापले आहे, किती हा क्षूद्रपणा!`

ते म्हणतात, 1990 मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला मोठ्या विश्वासानं मालवण-कणकवली मतदारसंघातून आमदारकी लढण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळी जे स्वप्न पाहिलं त्याचा गेली तीस वर्षं पाठपुरावा करत आलो. ते पूर्ण होतं असताना बाळासाहेबांचे शब्द मला आठवतात - 'नारायण विकास झालाच पाहिजे.' देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर 'विकासपुरुष'च आहेत. महिला, तरुण, गरीब हे त्यांच्या विकासनितीचा केंद्रबिंदू आहे. त्याचाच परिपाक म्हणून तीस वर्षांनी का होईना चिपी विमानतळावरुन आता विमानं उड्डाण घेणार आहेत. कोकणी माणसाच्या जागतिक स्वप्नांना नवं अवकाश खुलं होणार आहे. चला, माझ्या कोकणवासीयांना मी तुम्हाला साद घालतोय - एकमेकांच्या हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात.``

Narayan Rane
नितेश राणे म्हणतात, ``चिपी विमानतळाचे पूर्ण श्रेय हे साहेबांचेच!``

त्यांनी विमानतळ उभारणीचा प्रवसाही उलगडून दाखवला आहे. ``कोकणातले धुळीने, खड्ड्यांनी भरलेले रस्ते. पावसाळ्यात पाच-दहा मैलाचं अंतर कापणंसुद्धा मुश्किल होऊन जायचं. एसटी आणि बंदराला लागणाऱ्या बोटी एवढाच काय तो जगाशी संपर्क साधण्याचा मार्ग. पण त्यासाठी सुद्धा किती धडपडावं लागायचं. कोणाला शिक्षणासाठी परगावी जायचं असो. कोण्या लेकीबाळींना मुलाबाळांसह माहेराला यायचं असो. पोटाच्या ओढीनं कोणाला देशावर, मुंबईला जायचं असो की जीवाच्या दुखण्यानं आजारी पडलेल्या कोणाला औषधपाण्यासाठी दवाखाना गाठायचा असो. कोकणातला प्रवास ही मोठी अडचण होती. हिंदीत प्रवासाला 'यातायात' का म्हणतात, यावरुन ख्यातनाम साहित्यिक पु. लं. देशपांडे यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात खुमारीनं लिहिलं आहे. पण अशी 'यातायात' कोकणी माणसाच्या नशिबालाच पुजलेली होती.

Narayan Rane
चिपी विमानतळ परिसरातील `ताज, ओबेरॉय`च्या जागा सरकारने ताब्यात घ्याव्यात !

वडिलांचे निधन कशामुळे?

``माझ्या आजारी वडलांचं निधन वयाच्या अवघ्या बावन्नाव्या वर्षी झालं. कशामुळं ? माझ्या वरवडे गावातून त्यांना उपचारासाठी वेळेत हलवता आलं नाही. ना मी त्यांच्यापर्यंत मुंबईतून वेळेत पोहोचू शकलो. ते दिवस आपण प्रयत्नपूर्वक पालटवले. केवळ रस्ते नाहीत, प्रवासाच्या सुविधा नाहीत म्हणून असं जीवाचं माणूस गमवण्याची पाळी कोणावर येणार नाही. कणकवलीतही अत्यंत अद्ययावत रुग्णालय आपण उभारलं आहे,`` अशी आठवण त्यांनी सांगितली आहे.

आता मुंबईतलीच नव्हे तर अगदी जगाच्या पाठीवर कुठच्याही देशात असलेली माझ्या कोकणातली माहेरवाशीण अवघ्या काही तासात चिपी विमानतळावर तिच्या लेकराबाळांसह, सामानसुमानासह अवघ्या काही तासात 'लँड' होईल. देवगडचा माझा आंबा-काजू उत्पादक मुंबई-दुबईत त्याच्या मालाचा व्यवहार करण्यासाठी जाऊन एक-दोन दिवसात आपल्या बागेत परत येईल. महाराष्ट्रभर, जगभर पसरलेल्या चाकरमान्यांना गणपतीसाठी, शिमग्यासाठी काही तासात कोकणातलं घर गाठता येईल, असा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.

चिपी विमानतळ आणि आपला राजकीय प्रवास त्यांनी या निमित्ताने सांगितला आहे. ``पोटासाठी हजारो कोकणवासीय मुंबई गाठतात. धडपडतात. कष्ट करतात. राबतात. गरीबीशी झगडत राहतात. माझंही कुटुंब त्यातलंच. पुढं माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आलो. समाजकारणात, राजकारणात स्थिरावलो. ऐंशीच्या दशकाची अखेर होती. मुंबईत 'बेस्ट'चा चेअरमन होतो मी. 1990 ची विधानसभा निवडणूक लागली. बाळासाहेबांनी मला आदेश दिला. 'नारायण, तू मालवण-कणकवलीतून लढायचं.' खरं तर या मतदारसंघाची फार ओळख मला नव्हती. प्रचारासाठी अवघे 28 दिवस हातात होते. पण साहेबांचा आदेश म्हटल्यावर काय करणार? गेलो, लढलो आणि जिंकलोही. आमदार झालो. सिंधुदुर्ग जिल्ह्याची तेव्हाची ओळख फार चांगली नव्हती. रस्ते नाहीत. पुरेशी वीज नाही. एवढंच काय फेब्रुवारीनंतर प्यायला पाणीही नसे. आमच्या मालवणी भाषेत सांगायचं तर 'दरिद्री जिल्हा'. त्यावर मी त्यांना म्हणायचो, 'आपल्या जिल्ह्याला 'दरिद्री' म्हणू नका. आपण त्याचा कायापालट करू,`` तो शब्द खरा ठरत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in