राष्ट्रवादी-शिवसेनेसोबत कसल्या बैठका घेता? : नाना पटोलेंनी काँग्रेस नेत्यांना झाप झापले

नवी मुंबईतील नेत्यांनी बूथ पातळीवरील मोर्चेबांधणी व सदस्य नोंदणी न केलेल्या कामांबाबत पटोले यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी-शिवसेनेसोबत कसल्या बैठका घेता? : नाना पटोलेंनी काँग्रेस नेत्यांना झाप झापले
Nana PatoleSarkarnama

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत फॉर्म्युला ठरवण्याचे सर्वाधिकार काँग्रेसच्या प्रदेश समितीला असून स्थानिक नेत्यांनी त्याबाबत चिंता करण्याचे काम नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी नवी मुंबईतील स्थानिक नेत्यांची कानउघडणी केली. वडार भवन येथे शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) स्थानिक नेत्यांसोबत झालेल्या बैठकीला काँग्रेसचे नेतेमंडळीही सहभागी झाल्याने त्याबाबत पटोले यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. (Nana Patole displeased with the work of Congress leaders in Navi Mumbai)

टिळक भवन येथील काँग्रेसच्या कार्यालयात नवी मुंबईतील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सदस्य नोंदणी, बूथ व प्रभाग पातळीवर कार्यकर्त्यांची मोर्चेंबांधणी आणि निवडणुकीबाबत नियोजन या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच, पटोले यांनी उपस्थित नेते व कार्यकर्त्यांचे निवडणुकीबाबत मत जाणून घेतले. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर पक्षाला काय फायदा होईल, याबाबत स्थानिक ज्येष्ठ नेत्यांकडून प्रदेशाध्यक्षांना महत्त्व पटवून दिले.

नवी मुंबईतील नेत्यांनी बूथ पातळीवरील मोर्चेबांधणी व सदस्य नोंदणी न केलेल्या कामांबाबत पटोले यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. तुम्हाला मोर्चेबांधणी करता येत नसेल, तर आम्ही दुसरी फळी तयार करू, शब्दांत सज्जड दम पटोले यांनी स्थानिक नेत्यांना दिला. नवी मुंबई महापालिकेसहीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तरीही नवी मुंबईतील स्थानिक नेते महाविकास आघाडीकरिता प्रयत्नशील आहेत. तसेच, जागा वाटपांकरिता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत वाटाघाटी सुरु असतात. याबाबत सानपाड्यातील वडार भवनात नुकताच काही दिवसांपूर्वी बैठकही पार पडली होती. या बैठकीला जागा वाटपांबाबत चर्चा करून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीची घोषणा केली होती. या सर्व विषयांवर पटोले यांनी नेते मंडळींवर आगपाखड केली.

स्वबळावर निवडणुका लढवण्याबाबत प्रदेश काँग्रेसने निर्णय घेतला असताना नवी मुंबईतील स्थानिक पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा का करता. वारंवार सांगूनही बैठका घेऊन प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिल्यास थेट कारवाई करण्याचा इशाराही पटोले यांनी दिला. जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी, माजी उपमहापौर रमांकात म्हात्रे, अविनाश लाड, महिला अध्यक्षा पुनम पाटील, प्रदेश सरचिटणीस रामचंद्र दळवी, प्रदेश सचिव आनंद सिंग, प्रमोद मोरे, सुधीर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेसला अवघ्या २० ते २२ जागांचा फॉर्म्युला कसा निश्चित करता

नवी मुंबई महापालिकेत महापालिकेत १२२ जागा असताना काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या २० ते २२ जागांचा फॉर्म्युला कसा निश्चित करता. काँग्रेसची ताकद कशी वाढणार, असे प्रश्न प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत उपस्थित केले. पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी बेलापूर आणि ऐरोली अशा दोन्ही विधान मतदारसंघात दोन नवे कार्याध्यक्षांची निवड केली जाणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले. तसेच, जबाबदारी पार पडता येत नसेल तर बाजूला व्हा, मी त्या ठिकाणी काँग्रेसतर्फे तरुणवर्गाला संधी देतो, असेही पटोले यांनी ज्येष्ठ नेत्यांना ठणकावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.